
Nandurbar Crime News : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर नगरपालिकेच्या प्रचाराला उधाण आले आहे. एकमेकांविरोधात अनेक गट-तट एकत्र आले आहे. या पॅनलमध्ये प्रचाराला उधाण आले असतानाच मोठे अक्रित घडले. जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे यांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. ऐन रणधुमाळीत झालेली ही अटक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. पोलिसांच्या अचुक टायमिंगवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
नवापूर पालिकेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जयंत जाधव, भाजपकडून अभिलाषा वसावे पाटील, काँग्रेसकडून दिपचंद जयस्वाल यांना नगराध्य पदाची उमेदवारी मिळाली आहे. नगरपालिकेसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे पॅनल उभे करण्यात आले आहे. तर दुसरीकडे त्याविरोधात जिल्हा विकास आघाडीने नगराध्यक्षासह पूर्ण पॅनल उभे केले आहे. त्याचेच बडोगे हे उमदेवार होते. बडोगे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. माजी आमदार शरद गावीत यांनी त्यांच्या पॅनलला पाठिंबा दिला आहे. तर त्यांनी शहरातून जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रचार फेरी सुद्धा काढली. पण अचानक गुजरात पोलिसांची एंट्री झाली आणि आता नवापूर पालिकेतील समिकरणंच बदलली आहेत.
उमेदवारी मागे घेण्याच्याच दिवशी कारवाई
उमेदवारी मागे घेण्याच्याच दिवशी गुजरात पोलिसांची कारवाई झाल्याने कोणी टायमिंग साधलं याची नवापूरमध्ये मोठी चर्चा आहे. बडोगे यांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. बडोगे यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मोठा दबाव असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. गुजरात पोलिसांनी त्यांना निवासस्थानातून अटक केली. तर बडोगे यांच्यावरील कारवाई ही संशयास्पद असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.
त्यांच्यावर पोलिसांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावर गुजरात दहशतवाद आणि संघटीत गुन्हे नियंत्रण कायदा 2015 चे कलम 3(1)(2) आणि कलम 3(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळेच त्यांना गुजरात पोलिसांच्या गांधीनगर येथील पथकाने अटक केली आहे. यावरून अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहे. आता पुढे काय होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.