पंढरपुरात राजकीय घमासान ! भाजप नेत्याची मुख्यमंत्र्यांवर असभ्य भाषेत टीका, 17 शिवसैनिकांकडून बदला

| Updated on: Feb 08, 2021 | 7:24 PM

पंढरपुरात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये टोकाचा वाद बघायला मिळत आहे (Dispute between ShivSena and BJP leaders in Pandharpur),

पंढरपुरात राजकीय घमासान ! भाजप नेत्याची मुख्यमंत्र्यांवर असभ्य भाषेत टीका, 17 शिवसैनिकांकडून बदला
Follow us on

पंढरपूर (सोलापूर) : भाजप-शिवसेनेची युती तुटल्यापासून दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टीका-टीप्पणी करत आहेत. मात्र, तरीही दोन्ही पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी एकमेकांवर टोकाची किंवा असभ्य टीका केल्याचं अद्याप समोर आलेलं नाही. पण पंढरपुरात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये टोकाचा वाद बघायला मिळत आहे. भाजप नेत्याने आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्य वक्तव्य केलं. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी संबंधित भाजप पदाधिकाऱ्यावर शाही फेकत मारहाण केली. या सर्व घडामोडींमुळे पंढरपुरातील राजकीय वातावरण तापलं आहे (Dispute between ShivSena and BJP leaders in Pandharpur).

कोरोना काळात वाढीव वीज बिले आल्याच्या मुद्द्यावरून भाजपने 5 फेब्रुवारीला महावितरण कार्यालयावर आंदोलन केलं. यावेळी वीज बीलाचा मुद्दा सोडून भाजपचे माजी शहराध्यक्ष शिरिष कटेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर असभ्य भाषेत टीका केली. कटेकरांनी पातळी सोडून केलेल्या टीकेमुळे शिवसैनिक संतप्त झाले. संतप्त शिवसैनिकांनी भाजप नेता शिरिष कटेकरांच्या अंगावर काळी शाई ओतली. साडी-चोळीचा आहेर केला. त्यांची मंदिर परिसरात वरात सुद्धा काढली. शिवसैनिकांच्या या स्टाइलने पंढरपुरात खळबळ माजली.

कटेकर यांच्यावर शाईफेक केल्यानंतर या प्रकरणावर सोलापूर जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. मुंबईत असलेल्या माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार राम कदम यांनी ट्विट केल्यानंतर या घटनेची राज्य पातळीवर भाजपने दखल घेतली. यानंतर काल (7 फेब्रुवारी) रात्री कटेकर यांच्यावर शाई फेकणाऱ्या 17 शिवसैनिकांना पंढरपूर पोलिसांनी अटक केली. कटेकर यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल झाला होताच. आज सकाळी अटक करून या शिवसैनिकांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना जामीन मिळाला.

शिवसैनिकांच्या या कृतीचे समर्थन शिवसेना नेत्यांनी केले आहे. या शिवसैनिकांचा जामीन मिळताच शिवसेना नेते शिवाजीराव सावंत यांनी त्यांचा जंगी सत्कार केला. त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर अशा पद्धतीने वक्तव्य करणाऱ्यांचा समाचार घेतल्याबद्दल शिवसैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. जर कोणी पुन्हा शिवसेना पक्षप्रुमखांबद्दल असभ्य वक्तव्य केले तर शिवसैनिक काय करतील हे आता दिसलं आहे. पण पुन्हा कोणी असा प्रयत्न केला तर यापेक्षा गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशारा सावंत यांनी दिला.

शिवसेना आणि भाजपमध्ये काही कारणाने राजकीय दुरावा तर झालाच आहे. पण आता हा दुरावा कार्यकर्त्यांच्या कृतीमधूनही दिसू लागला आहे. भाजप नेत्याने असभ्य भाषा वापरली आणि शिवसैनिकांनी त्याला चोपले (Dispute between ShivSena and BJP leaders in Pandharpur).