IPL Auction 2026 : आयपीएल लिलावात एमपीएलचे स्टार चमकले, महानआर्यमन सिंधिया म्हणाले…
मध्य प्रदेश क्रिकेट लीग स्पर्धेतील प्रतिभेला आयपीएल आणि डब्ल्यूपीएलमध्ये स्थान मिळालं आहे. फ्रेंचायझींनी एमपीएलमध्ये खेळलेल्या 14 खेळाडूंवर विश्वास टाकला आहे. यात अनेक खेळाडू राज्याच्या वरिष्ठ संघाकडून खेळलेले नाहीत हे विशेष..

मध्य प्रदेश क्रिकेट लीग स्पर्धेमुळे नव्या प्रतिभेला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली आहे. आयपीएल मिनी लिलावात त्याची प्रचिती दिसून आली. कारण आयपीएल आणि महिला प्रीमियर लीग स्पर्धेसाठी विविध फ्रेंचायझींनी 14 एमपीएल खेळलेल्या खेळाडूंची निवड केली आहे. विशेष म्हणजे अनेक खेळाडूंना यापूर्वी राज्याच्या वरिष्ठ संघाकडून खेळण्याची संधी देखील मिळाली नव्हती. मात्र आता आयपीएल आणि डब्ल्यूपीएलमध्ये आपला डंका वाजवण्यास सज्ज झाले आहेत. पुरुष गटात वेंकटेश अय्यरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात समाविष्ट केले आहे. शिवंग कुमार सनरायझर्स हैदराबादमध्ये, मंगेश यादव आरसीबीमध्ये आणि अक्षत रघुवंशी लखनौ सुपर जायंट्समध्ये सामील झाला आहे. कुलदीप सेन राजस्थान रॉयल्सकडून खेळेल. दिल्ली कॅपिटल्सने माधव तिवारीला, तर गुजरात टायटन्सने अर्शद खानला, लखनौ सुपर जायंट्सने आवेश खानला, सनरायझर्स हैदराबादने अनिकेत वर्माला कायम ठेवले आहे. आरसीबीने रजत पाटीदारवर विश्वास टाकला असून त्याच्याकडे कर्णधारपद आहे.
मध्य प्रदेश क्रिकेट लीग राज्यातील तरुणांसाठी एक प्रमुख व्यासपीठ असल्याचे सिद्ध होत आहे. गेल्या हंगामात अनिकेत वर्माप्रमाणेच शिवंग कुमार आणि मंगेश यादव या दोन पुरुष खेळाडूंनी केवळ एमपीएलमधील कामगिरीच्या आधारे आयपीएलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेसाठी यूपी वॉरियर्सने क्रांती गौरचा त्यांच्या संघात समावेश केला आहे. मुंबई इंडियन्सने संस्कृती गुप्ता आणि राहिला फिरदौसवर विश्वास टाकला आहे. तर गुजरात जायंट्सने अनुष्का शर्माला सामील केले आहे. एमपीएल आणि मध्य प्रदेश राज्य क्रिकेटमधून आयपीएल आणि डब्ल्यूपीएलमध्ये पोहोचलेल्या या खेळाडूंच्या यशाने हे सिद्ध केले आहे की, एमपीएल आता केवळ स्पर्धा नाही, तर प्रतिभेला स्थान देणारं एक मजबूत व्यासपीठ आहे.
एमपीएलचे अध्यक्ष आणि एमपीसीएचे अध्यक्ष महानआर्यमन सिंधिया म्हणाले, “मध्य प्रदेशातील खेळाडूंची आयपीएलसाठी निवड झाली आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे.” खेळाडूंचं कौतुक करताना महानआर्यमन सिंधिया पुढे म्हणाले की, “यावेळी 14 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. आम्हाला ही संख्या आणखी वाढवायची आहे जेणेकरून मध्य प्रदेशचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व बळकट होईल आणि नवीन प्रतिभेला उदयास येण्याची संधी मिळेल. तरुणांना संधी देणे हे माझे प्राधान्य आहे.”
एमपीएल महिला स्पर्धेने राज्यातील महिलांसाठीही नवीन मार्ग उघडले आहेत. गेल्या वर्षी सुरू झालेल्या महिला एमपीएलमधील चार खेळाडूंना डब्ल्यूपीएलमध्ये संधी मिळाल्या आहेत. क्रांती गौर (यूपी वॉरियर्स), संस्कृती गुप्ता (मुंबई इंडियन्स), राहिला फिरदौस (मुंबई इंडियन्स), पूजा वस्त्राकर (आरसीबी) आणि अनुष्का शर्मा (गुजरात जायंट्स) या डब्ल्यूपीएल संघांचा भाग आहेत. यापैकी काही खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत.
