Auto Fare Hike: पाच रुपयांच्या भाडेवाढीवरून डोंबिवलीत तिहेरी संघर्ष! रिक्षाचालकांचा संपाचा इशारा, तर भाजपकडून जिल्हा बंदचा अल्टिमेटम

Dombivli Auto Drivers Threaten Strike Over Fare Hike: डोंबिवलीत पाच रुपयांच्या रिक्षाभाडेवाढीवरून तिहेरी संघर्ष दिसून येत आहे. चालकांनी रिक्षा बंदचा इशारा दिला आहे. तर भाजपने जिल्हा बंदचा अल्टिमेटम दिला आहे.

Auto Fare Hike: पाच रुपयांच्या भाडेवाढीवरून डोंबिवलीत तिहेरी संघर्ष! रिक्षाचालकांचा संपाचा इशारा, तर भाजपकडून जिल्हा बंदचा अल्टिमेटम
Auto Fare Hike Row Escalates in Dombivli
| Updated on: Nov 25, 2026 | 6:00 PM

डोंबिवलीतील रिक्षाभाडेवाढीचा मुद्दा चांगलाच तापला असून अवघ्या पाच रुपयांच्या वाढीवरून रिक्षाचालक, प्रवासी आणि राजकीय पदाधिकारी आमनेसामने आले आहेत. डोंबिवली पश्चिमेतील रिक्षा स्टँडवर 23 नोव्हेंबरपासून पाच रुपये भाडेवाढ लागू करण्यात आल्याचे पोस्टर झळकल्यानंतर हा वाद उफाळून आला. रिक्षाचालकांनी भाडेवाढीचे समर्थन केले असताना प्रवाशांनी मात्र या दरवाढीला तीव्र विरोध दर्शवला आहे.

तर दुसरीकडे, या प्रकरणात भाजपनेही आक्रमक भूमिका घेत ठाणे जिल्हा बंदचा इशारा दिला आहे. रिक्षाचालकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या सहा ते सात वर्षांपासून रिक्षाभाड्यात कोणतीही वाढ झालेली नाही. इंधनाचे दर, वाहनांची देखभाल आणि इतर खर्च वाढत असताना भाडेवाढ होणे आवश्यक असल्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे पाच रुपयांची वाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे चालकांचे म्हणणे आहे.

Loading...

मात्र कोणतीही अधिकृत घोषणा किंवा आरटीओची मंजुरी नसताना भाडेवाढ कशी लागू केली, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. या वादात स्थानिक नगरसेविका आणि ‘ह’ प्रभाग क्षेत्र सभापती रवीना मात्रे यांनी मध्यस्थी केली. अधिकृत निर्णय होईपर्यंत रिक्षाचालकांनी जुन्याच दराने प्रवाशांची वाहतूक करावी, अशी विनंती त्यांनी केली. मात्र प्रशासन आणि प्रवाशांकडून सहकार्य मिळाले नाही, तर रिक्षा बंद करण्याचा इशारा रिक्षाचालकांच्या संघटनांनी दिला आहे.

दुसरीकडे, भाजपनेही या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. रिक्षांचे अधिकृत भाडेदर स्पष्ट करून त्याबाबतचे दरपत्रक लावण्यात यावे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. अन्यथा ठाणे जिल्हा बंद पुकारण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. प्रवासी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचा विरोध लक्षात घेता आरटीओ प्रशासनानेही भूमिका स्पष्ट केली आहे. मनमानी पद्धतीने भाडेवाढ करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन आरटीओकडून देण्यात आले आहे.

एकीकडे रिक्षाचालकांचा वाढीव भाड्याचा आग्रह, दुसरीकडे प्रवाशांचा विरोध आणि भाजपचा आंदोलनाचा इशारा, यामुळे डोंबिवलीतील रिक्षाभाडेवाढीचा प्रश्न आता चिघळला आहे. पाच रुपयांच्या या वादावर आरटीओ प्रशासन नेमका काय तोडगा काढणार आणि अधिकृत भाडेदर कधी जाहीर करणार, याकडे डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us