हुंड्यासाठी विवाहितेचं केलं टक्कल, नंतर तिच्यासोबत… सासरच्या मंडळीचं क्रौर्य; त्या घटनेने राज्य हादरलं!
Dowry Harassment : आजही जुन्या प्रथा डोकं वर काढताना पहायला मिळत आहे. आजही हुंड्यासाठी महिलांचा छळ केला जात आहे. अनेक महिलांना पैशांसाठी त्रास दिला जात आहे.

आपण आधुनिक भारताकडे वाटचाल करत असलो तरी आजही जुन्या प्रथा डोकं वर काढताना पहायला मिळत आहे. आजही हुंड्यासाठी महिलांचा छळ केला जात आहे. अनेक महिलांना पैशांसाठी त्रास दिला जात आहे. हुंड्यासाठी छळ करत सासरच्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठत थेट सुनेचं टक्कल केल्याची संतापजनक घटना कल्याणच्या वालधुनी परिसरात घडली आहे. या घटनेनंतर ही महिला सासरहून पळून माहेरी आली असून सध्या तिच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची दखल स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि या विवाहितेच्या सासरच्यांवर अतिशय कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
लग्नानंतर महिनाभरातच छळाला सुरुवात
या घटनेतील पीडित महिला ही मूळची उल्हासनगरला राहणारी आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये तिचं लग्न कल्याणच्या वालधुनी परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत झालं. लग्न करताना आमची हुंडा देण्याची परिस्थिती नसल्याचं माहेरच्यांनी सासरच्यांना सांगितलं होतं, मात्र तरीही लग्न झाल्यानंतर महिन्याभराने हुंड्यासाठी अमानुष छळ सुरू करण्यात आला.
महिलेसोबत भयंकर घडलं
ती गर्भवती असतानाही तिला जेवण न देणं, घरातलं जेवण फ्रिजमध्ये ठेवून देणं, अमानुष मारहाण करणं, गरम पाण्याने हात जाळणं, कोणत्याच गोष्टीसाठी पैसे न देणं असे प्रकार आपल्यासोबत झाल्याचं तिने सांगितलं आहे. मात्र माहेरची परिस्थिती गरीब असल्यानं तिने हे सगळं सहन केलं. मात्र त्यानंतर तर सासरच्यांनी तर कहरच केला. 7 जून रोजी डोक्यात उवा झाल्याचं म्हणत चक्क तिचं टक्कल केलं.
उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू
सासरच्यांनी केलेला हा छळ असह्य झाल्यानं पीडिता घरातून पळून तिच्या बहिणीकडे गेली आणि भावाला फोन करून आपल्या छळाची माहिती दिली. यानंतर तिच्या भावाने तिला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे. क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या या प्रकरणाची आता मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, आणि अफसानाच्या सासरच्यांवर अतिशय कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.