Kolhapur : दूधगंगा उजव्या कालव्याला पडलं भगदाड; ऐन उन्हाळ्यात कोल्हापुरात लाखो लिटर पाण्याची नासाडी

दुधगंगा उजवा व डावा कालवा आजवर अनेकवेळा फुटला आहे. फुटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दूधगंगा उजव्या कालव्याला सावर्डे पाटणकर येथील हद्दीत पडलेले भगदाड चार ते पाच दिवसात पूर्णपणे बुजवण्यात येईल, अशी ग्वाही पाटबंधारे अधिकारी अजिंक्य पाटील यांनी दिली आहे.

Kolhapur : दूधगंगा उजव्या कालव्याला पडलं भगदाड; ऐन उन्हाळ्यात कोल्हापुरात लाखो लिटर पाण्याची नासाडी
दुधगंगा उजव्या कालव्याला पडलं भगदाड
Image Credit source: tv9
भूषण पाटील

| Edited By: प्रदीप गरड

May 07, 2022 | 11:19 AM

कोल्हापूर : दूधगंगा उजव्या कालव्याला भगदाड (Canal leakage) पडले आहे. भुस्खल्लन झाल्याने भगदाड पडल्याची माहिती मिळत आहे. राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर गावाच्या हद्दीत हे भगदाड पडले आहे. याप्रकरणी आता ग्रामस्थ आक्रमक (Aggressive) झाले आहेत. ठेकेदाराने निकृष्ट काम केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारामुळे ऐन उन्हाळ्यात कोट्यवधी लिटर पाणी वाया (Water waste) गेले आहे. तर आगामी काही दिवस उन्हाचे असल्याने प्रचंड पाणीटंचाई आणि पीकांनाही पाणी कमी पडणार आहे. येथील मोरेंचा नाळवा हद्दीत भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. पाणी साचून शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ऐन उन्हाळ्यात कालव्याला भगदाड पडल्याने दुरुस्तीसाठी बराच कालावधी लागणार असल्याने हजारो हेक्टर शेतीला फटका बसणार आहे.

ठोस उपाययोजना अद्याप नाहीच

लोकप्रतिनिधी व स्थानिक अधिकाऱ्यांनी सततची कालवा फुटी व गळती थांबवावी, अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याने काल संध्याकाळपर्यंत तरी घटनास्थळाला भेट दिली नव्हती. काळम्मावाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यात 1999पासून टप्प्याटप्प्याने पाणी सोडले होते, पण दुधगंगा उजवा व डावा कालवा आजवर अनेकवेळा फुटला आहे. फुटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कालव्याचे काम अपूर्ण आहे. त्यासोबतच अस्तरीकरणाचे कामही निकृष्ट झाले म्हणून कालवेग्रस्त संघर्ष समिती व भूमिपूत्र यांनी वेळोवेळी आंदोलन केले. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या हे निदर्शनास आणून दिले होते. तरीही ठोस उपाययोजना अद्याप झालेली नाही. कालवा फुटीमुळे स्थानिक शेतकरी त्रस्त असून यावर उपाय म्हणून जिओ सिंथेटिक अस्तरीकरणाचा प्रयोग केला होता. तोही धुळ खात पडला आहे.

‘चार ते पाच दिवसात पूर्णपणे बुजवणार भगदाड’

कालव्यातील झाडे झुडपे व दगडगोटे प्रवाहात अडथळा ठरत आहेत. दरवर्षी लाखो रुपये खर्च कालवा दुरूस्तीवर केला जात आहे. तरीही हे प्रकार का घडत आहेत, अशी विचारणा स्थानिक ग्रामस्थ तसेच शेतकरी वर्गाकडून होत आहे. कालव्यातून सध्या 800 ते 900 क्यूसेक दाबाने पाणी सोडण्यात येते आहे. हा दाब आणखी वाढल्यास समस्या उग्र रूप धारण करेल. कालव्याला भगदाड पडून पाच तास झाले तरी पाणी वाहत होते. त्यामुळे दूधगंगा नदीमध्ये गढूळ पाणी वाहत होते. दरम्यान, काळम्मावाडी धरणाच्या दूधगंगा उजव्या कालव्याला सावर्डे पाटणकर येथील हद्दीत पडलेले भगदाड चार ते पाच दिवसात पूर्णपणे बुजवण्यात येईल, अशी ग्वाही पाटबंधारे अधिकारी अजिंक्य पाटील यांनी दिली आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें