कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकाकडे ईडीची कारवाई, चंदेरी नगरीत 12 तास चौकशी

ED raid: कोल्हापूर जिल्ह्यात ईडीकडून कारवाई करण्यात आली. चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हुपरी येथील एका उद्योजकाकडे 12 तास पथकाने चौकशी केली. त्यानंतर 24 तारखेला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकाकडे ईडीची कारवाई, चंदेरी नगरीत 12 तास चौकशी
ईडी
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 21, 2025 | 11:33 AM

ED raid: अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकावर कारवाई केली. चांदीच्या दागिन्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हुपरी येथे ही कारवाई करण्यात आली. हुपरी हद्दीमध्ये पहिल्यांदाच ईडीची कारवाई झाली. येथील उद्योजक आणि माजी उपनगराध्यक्ष भरतराव लठ्ठे यांच्या निवासस्थानी ईडीकडून कारवाई करत 12 तास चौकशी करण्यात आली. ईडीचे अधिकारी चौकशी करत असलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अत्यंत गोपनीय पद्धतीने चौकशी झाली.

चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध गाव

हुपरी हे गाव चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. हुपरी गावांमध्ये पहिल्यांदाच ईडीची कारवाई झाली. हुपरीचे माजी उपनगराध्यक्ष व भाजपाचे माजी पक्ष प्रतोद, चांदीचे उद्योजक भरतराव लठ्ठे यांच्या घरावर ईडीच्या पथकाने छापेमारी केली. या कारवाईत नेमके काय मिळाले? त्याची माहिती मिळाली नाही. परंतु भरतराव लठ्ठे यांना 24 तारखेला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे. त्यांना मुंबई येथील ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहण्याचे मुंबई ईडीच्या पथकाने म्हटले आहे.

तपासाला सहकार्य केले…

ईडीची छापेमारी झाली तेव्हा भरतराव लठ्ठे बाहेर होते. त्यामुळे त्यांना 24 तारखेला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश पथकाने दिले आहे. त्यानुसार भरतराव लठ्ठे हे ईडी कार्यालयामध्ये हजर होतील, अशी माहिती त्यांचे चिरंजीव राकेश लठ्ठे यांनी दिली. ईडीच्या पथकाला आम्ही तपासासाठी सहकार्य केले.

ईडीने सुमारे १२ तास कसून चौकशी केली. या चौकशीत लठ्ठे यांचे दुबई येथे असलेले प्लॉट, खाजगी सावकारी, निधी बँक याबाबत माहिती घेतली. ईडीचे अधिकारी निधी बँक कार्यालयात गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी चौकशी केली. तसेच घरातील सर्व लोकांचे दुबई कनेक्शन काय आहे? याचा तपास ईडी करत आहे. गेल्या वर्षभरात उद्योजक लठ्ठे यांनी दुबईसह अनेक देशांचा प्रवास केला. त्यामुळे ईडीचे लक्ष त्यांच्यावर केंद्रित झाले आहे.

Follow Us