Egg Price Hike: सण संपताच महागाईचा फटका बसणार, अंडी महागणार, किती रुपयांनी वाढणार?
Inflations: नोव्हेंबर महिना संपताच महागाई वाढणार आहे. डिसेंबर महिन्यात महागाईची लाट येणार असून ग्राहकांच्या बजेटवर मोठा परिणान होणार आहे.

Egg Chicken Price: सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने आता महागाीची लाट येणारा आहे. देशात अंडी आणि चिकनच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचू शकतात. पोल्ट्री उद्योगाच्या मते, साठेबाजी, इथेनॉल उत्पादनासाठी धान्याचा गैरवापर आणि महाराष्ट्र व कर्नाटकातील कमी पावसामुळे गेल्या वर्षभरात मका आणि भरड तांदळाच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. या वाढत्या उत्पादन खर्चाचा थेट परिणाम बाजारावर होईल. डिसेंबरपर्यंत अंडी आणि चिकनच्या किरकोळ आणि घाऊक किमतींमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते.
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये पोल्ट्री उत्पादनांचा खप सर्वाधिक असतो. मात्र, यावेळी ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागेल. उद्योगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, सध्या ६-७ रुपये प्रति नग असलेली घाऊक अंडी डिसेंबरपर्यंत ७-८ रुपये प्रति नग होऊ शकतात. दरम्यान, सध्या २२५-२५० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध असलेल्या चिकनच्या किमती २६०-२७५ रुपये प्रति किलोपर्यंत वाढू शकतात. एकूणच, डिसेंबरपर्यंत कुक्कुट उत्पादनांच्या किमती २५ ते ३० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
या दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे कुक्कुट खाद्याच्या कच्च्या मालाच्या वाढत्या किमती. गेल्या वर्षभरात मका आणि भरड तांदळाच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. गेल्या वर्षी १८ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध असलेला मका आता ३४ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. डिसेंबरपर्यंत तो ४० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, भरड तांदळाची किंमतही १४-१५ रुपये प्रति किलोवरून ३१-३२ रुपये प्रति किलोपर्यंत वाढली आहे. ज्वारी, बाजरी आणि नाचणी यांसारखे इतर पर्याय वापरणे देखील कुक्कुटपालन उद्योगासाठी खूप महाग ठरत आहे.
मका आणि तांदळाच्या तुटवड्याला अनेक प्रमुख घटक कारणीभूत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या प्रमुख खरीप उत्पादक राज्यांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे यावर्षी खरीप मक्याच्या उत्पादनात १५-१६ टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, इथेनॉल उत्पादनासाठी मक्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने, कुक्कुटपालन उद्योगासाठी त्याची उपलब्धता कमी होत आहे. पुरवठा साखळीतील मध्यस्थांकडून होणारी साठेबाजी आणि व्यापाऱ्यांकडील साठा देखील धान्याच्या भावातील तीव्र वाढीस कारणीभूत ठरत आहे.