लुंगी नेसल्याने राऊतांनी घेरलं, आता रवींद्र चव्हाणांनी आदित्य ठाकरेंचा तो फोटो काढला बाहेर, वातावरण तापलं!

खासदार संजय राऊत यांनी रवींद्र चव्हाण यांचा एक फोटो अपलोड केला आहे. त्या फोटोला आता रवींद्र चव्हाण यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

लुंगी नेसल्याने राऊतांनी घेरलं, आता रवींद्र चव्हाणांनी आदित्य ठाकरेंचा तो फोटो काढला बाहेर, वातावरण तापलं!
sanjay raut and ravindra chavan
Image Credit source: एक्स
| Updated on: Jan 13, 2026 | 4:15 PM

Ravindra Chavan : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बड्या नेत्यांच्या सभा, रॅलींचे राज्यतील महत्त्वाच्या शहरांत आयोजन करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे या जाहीर सभांमध्ये नेतेमंडळी विरोधकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. जुनी प्रकरणं बाहेर काढून विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल यासाठी पूर्ण ताकद पणाला लवली जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स खात्यावर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा एक फोटो पोस्ट करून अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा काहीही करत असल्याचे म्हणत हल्लाबोल केला आहे. आता राऊतांच्या याच टीकेला रवींद्र चव्हाण यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. त्यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा फोटो पोस्ट करून राऊत, ठाकरे गटाला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केलाय.

नेमकं प्रकरण काय?

संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स खात्यावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये रवींद्र चव्हाण हे लुंगीमध्ये दिसत आहेत. त्यांच्या शेजारी मुख्यमंत्री फडणवीस हेदेखील आहेत. एका सभेतील हा फोटो आहे. याच फोटोचा आधार घेत राऊतांनी भाजपावर टीका केली आहे. हा रसमलाई इफेक्ट (अण्णामलाई) आहे. रवींद्र चव्हाण दाक्षिणात्य पद्धतीची लुंगी नेसून महायुतीच्या सभेत आले आहेत. गुडघ्याला मार लागलाय म्हणून लुंगी नेसल्याचे ते सांगत आहेत. मग मग मोकळा ढाकला मराठी लेंगा घालता आला असता, असा टोला लगावत त्यांनी यांनी चव्हाण यांना घेरलं आहे.

मुळात ती माझी वैयक्तिक बाब

आता राऊत यांच्या टीकेला रविंद्र चव्हाण यांनीदेखील जशास तसे उत्तर दिले आहे. चव्हाण यांनी फेसबुकवर आदित्य ठाकरेंचा फोटो पोस्ट करून राऊतांना घेरलं आहे. ‘जिनके खुद के घर शीशे के हों, वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते. गुडघ्याच्या व्याधीमुळे मी तसा पेहराव केला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारदरम्यान झालेली दुखापत हे त्याचं मुख्य कारण आहे. मुळात ती माझी वैयक्तिक बाब आहे. ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः ‘ या विचारधारेचे संस्कार आमच्यावर आहेत. म्हणून तुम्ही जीभ उचलली तरी मी संयम राखून आहे आणि राहीन, असे रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत.

ज्यांच्याकडे स्वतःच्या कामाबद्दल…

सोबतच, राहिला प्रश्न टीकेचा…तर ज्यांच्याकडे स्वतःच्या कामाबद्दल आणि विकासावर बोलण्यासारखं काही नसतं ते असली विधानं करत असतात. मतांसाठी लुंगी घालणाऱ्यांचा फोटो खाली आहेच, असे प्रत्युतर देत संजय राऊत यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा, असे चव्हाण म्हणाले आहेत.