Election Commission Hearing on NCP | अजित पवार गटाचा सर्वात मोठा दावा, निवडणूक आयोगात काय-काय घडलं?

अजित पवार गटाचे वकील नीरज किशोर कौल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. अजित पवारांची अध्यक्ष म्हणून निवड योग्य आणि कायद्याला धरुन आहे. एकच व्यक्ती पक्षावर दावा करु शकत नाही, असा युक्तिवाद नीरज किशोर कौल यांनी केला. 

Election Commission Hearing on NCP | अजित पवार गटाचा सर्वात मोठा दावा, निवडणूक आयोगात काय-काय घडलं?
| Updated on: Oct 09, 2023 | 6:57 PM

नवी दिल्ली | 9 ऑक्टोबर 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावरुन आज पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे वकील निवडणूक आयोगात उशिराने उपस्थित राहिल्याने सुनावणी 15 मिनिटे उशिराने सुरु झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट आज युक्तिवाद करणार असल्याचं याआधीच स्पष्ट झालं होतं. अजित पवार गटाने गेल्या सुनावणीवेळी देखील युक्तिवाद केला होता. त्यानंतर आज पुन्हा निवडणूक आयोग अजित पवार गटाची भूमिका ऐकून घेतली. अजित पवार गटाची भूमिका ऐकून घेतल्यानंतर शरद पवार गटाची भूमिका निवडणूक आयोग ऐकणार आहे. दोघांच्या युक्तिवादातील मुद्द्यांचा विचार करुन निवडणूक याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहे.

अजित पवार गटाचे वकील नीरज किशोर कौल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. अजित पवारांची अध्यक्ष म्हणून निवड योग्य आणि कायद्याला धरुन आहे. एकच व्यक्ती पक्षावर दावा करु शकत नाही, असा युक्तिवाद नीरज किशोर कौल यांनी केलाय. पक्षामध्ये अंतर्गत लोकशाहीच नाही. पक्षांतर्गत नियुक्त्या निवडणुकीनुसार झालेल्या नाहीत, असा युक्तिवाद कौल यांनी केलाय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आमच्या सोबत आहेत. त्यांच्या सहीने सर्व नियुक्त्या झाल्या आहेत. त्यामुळे आमची बाजू भक्कम आहे, असा युक्तिवात अजित पवार गटाने केला.

बहुमत आमच्याकडे, अजित पवार गटाचा दावा

पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष कोण? असा प्रश्न उपस्थित होतोय. आमच्याकडे विधीमंडळातील बहुमत आहे. दीड लाखापेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र आमच्याकडे आहेत. त्याचा विचार करुनच निर्णय घ्यावा लागेल. राज्य आणि देशातील पदाधिकारी आमच्यासोबत आहेत, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय. अजित पवार यांचा युक्तिवाद सुरु असताना शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे नीरज कौल यांचा युक्तिवादावर मनु सिंघवी काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं.

महाराष्ट्रातील 53 पैकी 42 आमदार आमच्याकडे आहेत. तसेच नागालँडचे 7 आमदार आमच्यासोबत आहेत, असं अजित पवार गटाने केलाय. अजित पवार गटाने शिवसेना प्रकरणाचा दाखला दिलाय. राज्य आणि देशातील पदाधिकारी आमच्यासोबत आहेत, असा दावा अजित पवार गटाने केलाय. अजित पवार गटाने सादिक अली प्रकरणाचा दाखला दिला.

‘शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले’

शरद पवारांनी आपलं घर चालवलं तसाच पक्ष चालवला. शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले. एका सहिने नियुक्त्या केल्या जात होत्या. पक्षात यापूर्वीच्या संघटनात्मक नेमणूक कायद्याला धरुन नव्हत्या, असा दावा अजित पवार गटाने केलाय. प्रत्येक कार्यकर्त्याची आणि पदाधिकारी ओळख करुन देणं शक्य होणार नाही, असंही अजित पवार गटाचे वकील म्हणाले आहेत.

काँग्रेसच्या फुटीचादेखील दाखला देण्यात आला. अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी आक्रमक युक्तिवाद केलाय. पक्षाची घटना आणि घेतलेले निर्णय यात तफावत आहे, असा युक्तिवाद वकील मनिंदर सिंह यांनी केला. यावेळी मनिंदर सिंह यांनी पक्षाची घटना वाचवून दाखवली.

शरद पवार यांच्या नियुक्तीवर सवाल

शरद पवार यांची अध्यक्षपदाची निवड निवडणूक घेऊन झालेली नाही. निवडून न येता एक व्यक्ती पदाधिकाऱ्यांची नेमणूका करत होता. ते योग्य आहे का? शरद पवार एकदाही निवडून आले नाहीत. मग त्यांची नियुक्ती वैध कसं म्हणता येईल? अजित पवार गटाची नियुक्ती कायदेशीर आहे. तर शरद पवार गटाची निवड बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकिल मनिंदर सिंह यांनी केला. यावेळी पी. ए. संगमा यांच्या प्रकरणाचादेखील दाखला देण्यात आला.

आम्ही दिलेल्या कागदपत्रांची तपासणी करा. सादर करण्यात आलेली प्रतिज्ञापत्र योग्य आहेत. त्यांची तपासणी देखील करा. जी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत त्यामध्ये कोणतीही चूक नाही, असा दावा नीरज कौल यांनी केलाय. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने आतापर्यंत चार वेळा संधी दिली. त्यामुळे अजून वेळ वाढवून देऊ नका, असं अजित पवार गटाने म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने पक्षातील फुटीवर चर्चा करुन निर्णय घ्यावा, असं अजित पवार गटाच्या वकिलांनी म्हटलंय.

पक्षाच नाव आणि चिन्ह आम्हालाच द्यावा. पक्षात फूट झालीय. पण पक्षात फूट आहे की नाही, याबाबबत निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा. निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय. अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरु असतानाच शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी हस्तक्षेप घेत युक्तिवाद केला.

शरद पवार गटाचा युक्तिवाद सुरु

शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. अजित पवार गटात कोण आहे ते स्पष्ट झालेलं नाही. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या सदस्य आणि आमदारांचा आकडा एकदा तपासावा. बहुसंख्य आमदार कोण आहेत? ते सांगा, असा युक्तिवाद शरद पवार गटाने केला. पक्षांतर्गत निवडीवेळी कोणीही आक्षेप घेतला नव्हता, असा युक्तिवाद शरद पवार गटाने केला.

शरद पवार गटाला दिलासा

आमदार जाणं हा त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे पक्ष आमचाच आहे. बहुसंख्य लोक आमच्यासोबत आहेत. पक्षात कुठेही फूट पडलेली नाही. त्यातला एक गट बाहेर गेलाय, असा युक्तिवाद शरद पवार गटाने केला. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला दिलासा देण्यात आलाय. येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे सादर करा, असं निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला म्हटलं आहे.

पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला, वकील अभिषेक मनु सिंघवी यांची माहिती

“राष्ट्रवादीच्या प्रकरणावर सुनावणी झालीय. याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद संपलाय. तीन व्यक्तींनी त्यांच्याकडून युक्तिवाद केलाय. आम्हाला युक्तिवादासाठी 9 नोव्हेंबरचा वेळ दिलाय. याचिकाकर्त्यांकडून घाई केली जात होती. त्याबाबत निवडणूक आयोगाने ताशेरे ओढले. आमचा अजून युक्तिवाद सुरु झालेला नाही. आम्हाला 9 हजार प्रतिज्ञापत्र त्रुटी आढळल्या आहेत. या सुनावणीला लवकर संपण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच आमच्या युक्तिवादाला वेळ न देण्याचा याचिकाकर्त्यांचा प्रयत्न होता, पण त्यांचा तो प्रयत्न निवडणूक आयोगाने धुडकवून लावलाय”, अशी प्रतिक्रिया अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली.