Gyan Bharatam Mission: पतंजली विद्यापीठाला क्लस्टर सेंटर म्हणून मान्यता; बाबा रामदेवांकडून ज्ञान भारतम मिशनचं महत्त्व स्पष्ट
Gyan Bharatam Mission: बाबा रामदेव यांच्या पतंजली विद्यापीठाच्या कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या ज्ञान भारतम मिशनने या संस्थेला क्लस्टर सेंटर म्हणून मान्यता दिली आहे. याबद्दल योगगुरू बाबा रामदेव यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

हरिद्वार इथं पार पडलेल्या समारंभात सांस्कृतिक मंत्रालयाच्या ज्ञान भारतम मिशनने पतंजली विद्यापीठाला क्लस्टर सेंटर म्हणून मान्यता दिली. पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू योगगुरू बाबा रामदेव, कुलगुरू डॉ. आचार्य बालकृष्ण, ज्ञान भारतम मिशनचे प्रकल्प संचालक डॉ. अनिर्वण दास, एनएमएमचे समन्वयक डॉ. श्रीधर बारिक आणि एनएमएमचे समन्वयक विश्वरंजन मलिक यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी बाबा रामदेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत आणि ज्ञान भारतम मिशनच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. रामदेव बाबांनी ज्ञान भारतम मिशनला भारतीय ज्ञान परंपरेचं जतन करण्याचं एक उदाहरण असल्याचं म्हटलं.
या समारंभात डॉ. आचार्य बालकृष्ण यांनी सांगितलं, “या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 33 सामंजस्य करार झाले आहेत. पतंजली विद्यापीठ हे योग शिक्षणासाठी समर्पित असलेलं पहिलं क्लस्टर केंद्र आहे. पतंजली पिद्यापीठाने आतापर्यंत 50 हजारांहून अधिक प्राचीन ग्रंथ जतन केले आहेत. तर 4.2 दशलक्ष पृष्ठांचं डिजिटायझेशन केलं आहे. 40 हून अधिक हस्तलिखित परिष्कृत आणि पुनर्प्रकाशित केली आहेत.”

ज्ञान भारतमचं क्लस्टर सेंटर म्हणून मान्यता मिळाल्यानंतर आता पतंजली 20 केंद्रांना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रोत्साहन देणार आहे. भारतीय संस्कृती जतन करण्याच्या या मोहिमेशी त्यांना पतंजली जोडणार आहे. त्यामुळे या कार्याची व्याप्ती अधिक वाढणार आहे.
यावेळी ज्ञान भारतम मिशनचे प्रकल्प संचालक डॉ. अनिर्वण दास म्हणाले, “ज्ञान भारतम मिशन अंतर्गत एक क्लस्टर सेंटर म्हणून पतंजली विद्यापीठ केवळ योग आणि आयुर्वेदावर आधारित हस्तलिखितांवर संशोधन करणार नाही तर ते शिक्षण क्रांतीशीदेखील जोडलं जाईल आणि समाजात पोहोचवलं जाईल.”
या समारंभाला पतंलजी विद्यापीठाच्या मानव्यविद्या आणि प्राचीन अभ्यास विद्याशाखेच्या डीन डॉ. साध्वी देवप्रिया यांच्यासह डॉ. अनुराग वार्ष्णेय, डॉ. सतपाल, डॉ. करुणा. डॉ. स्वाती, डॉ. राजेश मिश्रा, पतंजली संशोधन संस्थेच्या डॉ. रश्मी मित्तल आणि सर्व विद्यार्थी, शास्त्रज्ञ उपस्थित होते. पतंजली विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
