अहिल्यादेवींचा जीवनपट आता मोठ्या पडद्यावर, फडणवीसांची मोठी घोषणा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त आज अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती.

अहिल्यादेवींचा जीवनपट आता मोठ्या पडद्यावर, फडणवीसांची मोठी घोषणा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 31, 2025 | 5:10 PM

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त आज अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना राज्य सरकार अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर चित्रपट काढणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास छावा चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आला, त्याचप्रमाणे राज्य सरकार अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर चित्रपट काढणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.

काय म्हणाले फडणवीस?

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर केलं. राम शिंदे आणि आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच्या या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. यासाठी जेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, एकीकडे अहिल्यादेवी यांचं जन्मस्थळ आहे आणि दुसरीकडे कर्मस्थळ आहे.यावेळी मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राजधानीत कर्मस्थळावर सभा घेणार आहे. मात्र पुढच्यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी नक्की येईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.

दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की, अहिल्यादेवी यांनी 28 वर्ष राज्यकारभार सांभाळला. छत्रपती शिवरायांनंतर लोककल्याणकारी राज्य चालवणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांचं नाव येतं. भारतात बनलेल्या ब्रम्होसने पाकिस्तानची तळं उद्ध्वस्त केली, त्याचप्रमाणे अहिल्यादेवी यांनी बलशाली तोफखाना तयार केला होता, त्यामुळे त्यांच्या राज्यावर कोणीही हल्ला करण्याचं धाडस केलं नाही. औरंगजेबानं सोमनाथ मंदिर तोडलं, त्यावेळी कोणत्याही राजाचं ते मंदिर बांधण्याचं धाडस झालं नाही, मात्र अहिल्यादेवी होळकर यांनी त्याच मंदिराशेजारी दुसरं मंदिर उभारलं, पडलेल्या मंदिराचे अवशेष त्यांनी तसेच ठेवले, कारण पाडलेलं मंदिर बघितल्यानंतर हिंदू लोक जागृत होतील, असं यावेळी बोलताना फडणवीस यांनी म्हटलं. अहिल्यादेवी यांनी हुंडाप्रथा देखील बंद केली होती, त्यांच्या काळात कोणाचीही हुंडा घेण्याची आणि मागण्याची हिंमत होत नव्हती, असंही यावेळी फडणवीस म्हणाले.