‘2 कोटी द्या, मंत्रिपद घ्या?’, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या नावे भाजपच्या आमदारांना फसवण्याचा डाव उघडकीस आलाय. पावणेदोन कोटींच्या बदल्यात मंत्रिपद देण्याचं आश्वासन देणाऱ्या एका तोतयाला पोलिसांनी अटक केलीय.

2 कोटी द्या, मंत्रिपद घ्या?, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: Social Media
| Updated on: May 17, 2023 | 11:59 PM

नागपूर : पावणेदोन कोटी द्या आणि थेट मंत्रिपद घ्या, भाजपच्या 4 आमदारांना ही ऑफर देण्यात आली होती. नागपूर मध्यचे आमदार विकास कुंभारे, कामठीचे आमदार टेकचंद सावरकर, आर्वीचे आमदार नारायण कुचे आणि हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे या 4 आमदारांना भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा पीए असल्याचं भासवून फोन करण्यात आला होता. मंत्रिपद मिळवून देण्यासाठी या 4 आमदारांकडे कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे आमदार विकास कुंभारे यांना पहिला फोन केला तो खुद्द जे पी नड्डा असल्याचं भासवून. त्यानंतर अनेक वेळा जे.पी नड्डा यांचा पीए असल्याचं भासवून फोन करण्यात आला आणि पैशांची मागणी करण्यात आली.

आमदार कुंभारे यांचा विश्वास संपादन करण्यासाठी फोनवरुन पुन्हा एकदा जे. पी. नड्डा बोलतायत असं भासवण्यात आलं. मंत्रिपदासाठी आणि कर्नाटकातल्या काही कामांसाठी ऑनलाईन पेमेंट करण्याची विनंतीही आमदार कुंभारे यांना करण्यात आली. वारंवार पैसे मागितले जात असल्यानं आमदार कुंभारे यांना संशय आला. त्यांनी नागपूर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनीही हे सगळं संभाषण ऐकलं आणि त्यानंतर आरोपी निरज सिंह राठोड याला गुजरातच्या मोरबीतून अटक करण्यात आली.

पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर निरजसिंह राठोड या भामट्यानं आणखी काही आमदारांनाही जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचं निष्पन्न झालं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

जुलै महिन्यात महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. तेव्हापासून मंत्रिमंडळाचा विस्तार होणं बाकी आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी तारीख-पे-तारीख दिली जातेय. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. आरोपी निरज सिंह राठोड यानंही हीच वेळ साधून आमदारांना जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न केला. पण तोच स्वत: पोलिसांच्या जाळ्यात फसलाय.