भावाच्या लग्नासाठी गावी जाणं ठरलं, आई-वडिलांना सरप्राईज देणार होते पण…; समृद्धी महामार्गावर चिमुकल्यासह तिघांचा अंत
Samruddhi Highway Accident: पुण्याहून जालन्याला सरप्राईज देण्यासाठी निघाले होते. पण समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पती-पत्नीसह अवघ्या ७ वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्यावरून जालन्याकडे निघालेल्या कारची ट्रकला जोरदार धडक बसली. यामुळे हा अपघात घडला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लहान भावाच्या लग्नाचे नियोजन सुरू असल्याने आई-वडिलांना न सांगता अचानक गावी जाऊन त्यांना सरप्राईज देण्यासाठी पुण्याहून जालन्याकडे निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. समृद्धी महामार्गावरील वेरूळ परिसरात भरधाव कारने समोरून जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पती-पत्नीसह त्यांच्या सात वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात प्रतीक रामकिसन जगदाळे (वय ३५), पत्नी श्रेया राजेंद्र पांडे (वय ३२) आणि मुलगा रुद्रांश प्रतीक जगदाळे (वय ७, सर्व रा. मुळशी, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. प्रतीक हे कुटुंबासह शनिवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास पुण्याहून जालन्याच्या दिशेन निघाले होते. समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरच्या चॅनेल क्रमांक ४४९ जवळ त्यांची MH 12 YS 1028 क्रमांकाची कार आली असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने पुढे जाणाऱ्या GJ 21 Y 3362 क्रमांकाच्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग ट्रकच्या मागील बाजूस घुसून अक्षरशः चक्काचूर झाला. कारमधील तिघेही गंभीर अवस्थेत वाहनात अडकून पडले होते. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गाच्या मदत पथकाने घटनास्थळी धाव घेतली. क्यूआरव्हीच्या मदतीने कारचे पत्रे कापून तिघांना बाहेर काढण्यात आले. मात्र या दुर्घटनेत तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.