फैजानने टाकलं जाळं, प्रेमविवाह करणाऱ्या ‘वर्षा’ला नवरा पवन नकोसा झाला, मुलांना खेळायला पाठवून… शेवटाने हळहळ
दोघांनी मिळून उभा केलेला संसार, व्यवसायात केलेली प्रगती आणि दोन मुलांचं कुटुंब असं चित्र असताना अचानक नात्यात कटुता निर्माण झाली. पत्नीची हत्या करण्यापूर्वी पवनने मुलांना गार्डनमध्ये का पाठवलं होतं? या घटनेमागे नेमकं काय घडलं?

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला. तब्बल 18 वर्षांपूर्वी प्रेमविवाह करून संसार थाटणाऱ्या पवन आणि वर्षा यांच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली आणि नात्यात कटुता निर्माण झाली. वर्षाची फैजान उर्फ रेहान याच्याशी जवळीक वाढली. याची कुणकुण लागताच पवनने पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांमधील वाद वाढतच गेले. अखेर या वादाचा शेवट दोन मृत्यूंनी झाला. विशेष म्हणजे, पत्नीची हत्या करण्यापूर्वी पवनने दोन्ही मुलांना खेळण्यासाठी गार्डनमध्ये पाठवले होते.
पराठ्याच्या दुकानातून रेस्टॉरंटपर्यंतचा प्रवास
पवन आणि वर्षा यांनी 18 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला ते सीधी येथे राहत होते. त्यानंतर सुमारे 15 वर्षांपूर्वी ते इंदूरमध्ये स्थायिक झाले. दोघांनी नोकरी करून संसार उभा केला. मात्र, पवनची नोकरी सुटली. कंबरेच्या त्रासामुळे त्याला काम करणेही शक्य नव्हते. त्यामुळे दोघांनी मिळून पराठ्याचे दुकान सुरू केले. पुढे त्यांनी रेस्टॉरंटचा व्यवसाय सुरू केला. याच रेस्टॉरंटमध्ये सेटअप लावण्यासाठी आलेल्या फैजानची वर्षाशी ओळख झाली. हळूहळू दोघांमधील जवळीक वाढली आणि प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे पोलिस तपासात समोर आले.
पत्नीला समजावलं, मोबाईलमध्ये रेकॉर्डिंगही ठेवलं
वर्षा आणि फैजानमधील जवळीक समजल्यानंतर पवनने पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वर्षा पतीपासून वेगळे होण्याबाबत बोलू लागली होती. दोघांच्या संभाषणाची रेकॉर्डिंगही पवनने मोबाईलमध्ये ठेवली होती. मुलांचे भविष्य आणि संसारावरून घरात तणाव वाढत होता.
मुलांना गार्डनमध्ये पाठवून टोकाचे पाऊल
रविवारी पवनने मुलगा आणि मुलीला खेळण्यासाठी गार्डनमध्ये पाठवले. त्यानंतर पत्नीची साखळीने गळा आवळून हत्या केली. तिच्या गळ्यावर चाकूनेही वार केले. पुढे पवनने गळफास घेऊन आत्महत्या केली. दीड तासानंतर घरी परतलेल्या मुलांना आई-वडिलांचे मृतदेह दिसले.
दरम्यान, पोलिसांनी फैजानला आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह अन्य कलमांखाली अटक करून तुरुंगात पाठवले आहे. त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत 15 वर्षांचा मुलगा आणि 7 वर्षांची मुलगी पोरकी झाली.
