बाबा म्हणाले,’यंदा पिक नाही, कपडे, फटाकड्या कशा घ्यायच्या तुम्हाला?..भालगावातील लहानग्यांची व्यथा
राज्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे संकट ओढवले आहे. त्यामुळे अनेक पिके वाया गेली आहेत. शेती करपून गेल्याने आता शेतकरी राजा उद्धवस्थ झाला आहे. छत्रपती संभाजीनगरात भालगावातील शेतकऱ्याच्या मुलांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना आपली कैफियत मांडली आहे.

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी : पिकांच्या नुकसानीने शेतकऱ्यांना प्रंचड फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरातही आता चिमुकल्यांना याची झळ पोहचत आहे. सोयाबीन तूर आणि कापूस वाळून गेल्याने कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. एका शेतकऱ्यांच्या मुलांनी पिकांच्या करपल्याने झालेली अवस्था आणि वडिलांवर आलेल्या परिस्थितीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या चिमुकल्या मुलांनी आपली व्यथा कॅमऱ्यासमोर मांडली आहे.
राज्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे संकट ओढवले आहे. त्यामुळे अनेक पिके वाया गेली आहेत. शेती करपून गेल्याने आता शेतकरी राजा उद्धवस्थ झाला आहे. छत्रपती संभाजीनगरात भालगावातील शेतकऱ्याच्या मुलांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना आपली कैफियत मांडली आहे.
अभिजीत देवकर याने व्यथा मांडताना सांगितले की,’आमच्या पिकाचं नुकसान झालंय. एका महिन्यावर दिवाळी आलीय. आम्ही काय करावं? कपडे नाहीत, चपला नाहीत. शाळेला वह्या नाहीत, पुस्तकं नाहीत.आता आम्ही काय करायचं? गेल्या 50 दिवसांपासून पावसाने खंड घातला आणि आमची पिकं वाळवली. सोयाबीन, तूर, कापूस वाळून गेलं.पाऊस नाही, पाणी नाही.खायचं काय, प्यायचं काय, अशी चर्चा घरात होते. याची भरपाई द्या. शेतात पाणी नाही, काही नाही.
आम्हाला वह्या, पुस्तकंसुद्धा लवकर भेटत नाहीत
यावेळी अश्रू अनावर झाल्याने अभिजीत रडत म्हणाला की , ‘कापूस वाळलाय, पाणी नाही. बाबा म्हणाले होते की, दिवाळी आली की कपडे, फटाके, चपला घ्यायच्या दिवाळीला. त्याची बहिणी आरती देवकर ही आपली तक्रार मांडताना म्हणाली की, मी आठवीत आहे. यावर्षी पाऊस नाही, काही नाही. आम्हाला शाळंला जायला सायकल पाहिजे होती, मात्र आमचं स्वप्न पूर्ण झालं नाही. बाबा म्हणाले, की आता एका महिन्यावर दिवाळी आली. फटाके, कपडे कसे घ्यायचे? कापूस वाढला, पाणी नाही आमच्या शेतात. श्रीमंतांची मुलं इंग्रजी शाळेत जातात. आम्ही सरकारी शाळेत. आम्हाला वह्या, पुस्तकंसुद्धा लवकर भेटत नाहीत अशीही तक्रार यावेळी आरती हीने टीव्ही ९ मराठीशी बोलताना केली.