अखेर नरहरी झिरवाळ यांचे लाच प्रकरणावर थेट विधान, म्हणाले ‘मानसिक त्रास तर…’

मंत्री नरहरी झिरवाळ यांचे पीए रामदास गाडे आणि क्लर्क डेरिंगे यांच्यावर मेडिकल दुकानदारांकडून लाखो रुपयांची लाच घेतल्याचा आरोप एका स्टिंग ऑपरेशनद्वारे करण्यात आला आहे. आता या प्रकरणावर झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अखेर नरहरी झिरवाळ यांचे लाच प्रकरणावर थेट विधान, म्हणाले मानसिक त्रास तर...
Narhari Zirwal
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 22, 2026 | 12:22 PM

अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मुंबईतील मंत्रालयातील दालनात चक्क कोडिंगच्या भाषेत लाच मागितली जात असल्याचे समोर आले होते. एका स्टिंग ऑपरेशनद्वारे याबद्दल खुलासा करण्यात आला होता. या रॅकेटमध्ये मंत्र्यांचे पीए आणि काही कर्मचारी अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता या संपूर्ण प्रकरणावर नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले झिरवाळ?

नरहरी झिरवाळ यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हटले की, “जो कुणी हा प्रकार केला त्यांनी शत्रू म्हणून केला नाही. त्यांना त्रास झाला म्हणून त्यांनी तो प्रकार उघड केला आहे. बुद्धी पुर्वक केलं असं नाही. आता चौकशी सुरु आहे. जे काही घडलं ते सत्य आहे. चौकशीअंती पूर्ण सत्य बाहेर येईल.”

पुढे झिरवाळ म्हणाले की, ताईंनी समज दिली किंवा नाही हा विषयच नाही, ती पहिली बैठक होती… त्यामुळे समज देण्याचा प्रश्नच नाही. बिर्हाड आंदोलनाला मी सामोरं गेलो, सांगायला आदिवासियांचे आंदोलन होतं. पण सगळ्या समाजाचे नेते त्यात असतात. फक्त आदिवासी समाजाची मुलं होती असं नाही. शिंदेंचं सरकार असो किंवा फडणवीस यांचं सरकार असो मला मान सन्मान मिळालाय. ताईंना दादांच्या जागेवर घेतलं पाहिजे ही सगळ्यांची भावना होती.

“अशा घटना घडल्या की मानसिक त्रास होतोच”

दादा गेल्याचा फटका किती जणांना बसलाय हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहीत. राज्याच्या गरजेचा माणूस गेला याचं दु:खं आहे. अधिकारी कर्मचारी सगळ्यांना सुचना दिल्या की जे काही घडलं ते गलिष्छ प्रकरण झालं, माझ्यासारख्याला एक डाग लागला. कुठेही कलंक लागणार नाही याची काळजी घ्या आणि काम करा, अशा घटना घडल्या की मानसिक त्रास होतोच असे झिरवाळ पुढे म्हणाले.

नेमके प्रकरण काय?

मंत्री नरहरी झिरवाळ यांचे पीए रामदास गाडे आणि क्लर्क डेरिंगे यांच्यावर मेडिकल दुकानदारांकडून लाखो रुपयांची लाच घेतल्याचा आरोप एका स्टिंग ऑपरेशनद्वारे करण्यात आला आहे. औषध विक्रेत्यांच्या परवान्यांच्या संदर्भात हा प्रकार घडला आहे. एफडीएचे ड्रग्ज इन्स्पेक्टर जेव्हा एखाद्या मेडिकल दुकानात त्रुटी काढतात, तेव्हा त्या दुकानदाराचा परवाना निलंबित केला जातो. या निलंबनावर अपील करण्याचा अधिकार मंत्र्यांकडे असतो. पण त्या दुकानदाराने केलेल्या आरोपानुसार हे अपील खुद्द मंत्री ऐकण्याऐवजी त्यांचे पीए रामदास गाडे आणि क्लर्क डेरिंगे हेच ऐकत होते.