फटाक्यांमुळे अग्नितांडव! पिंपरी-चिंचवडमध्ये आगीच्या 50 घटना, तर नागपुरात.., कुठे काय काय घडलं?

राज्यात जागोजागी फटाक्यांमुळे अग्नितांडव दिसून आला. पिंपरी-चिंचवडमध्ये आगीच्या 50 घटना घडल्या. नागपुरातही अनेक दुचाकी जळून खाक झाल्या.

फटाक्यांमुळे अग्नितांडव! पिंपरी-चिंचवडमध्ये आगीच्या 50 घटना, तर नागपुरात.., कुठे काय काय घडलं?
fire crakcers
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 09, 2026 | 9:08 AM

राज्यात फटक्यांच्या आतषबाजीमुळे जागोजागी आगीच्या घटना घडल्या आहेत. मुंबई, ठाण्यासह पुणे जिल्ह्यातही आगीच्या घटना घडल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आगीच्या तब्बल 50 घटना घडल्या आहेत. दुसरीकडे नागपुरातही दुचाकी जळून आग लागल्याची घटना घडली. ठाण्यात रात्री लागलेल्या आगीच्या घटनेची स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दखल घ्यावी लागली. फटाक्यांमुळे घडलेल्या आगीच्या घटनांमुळे अग्निशमन दलाची एकच धावाधाव झाली. फटाक्यामुळे घडलेल्या आगीच्या घटनांनी सर्वसामान्यांचं टेन्शन वाढवलं आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात फटाक्यांचा कहर 

Loading...

पिंपरी-चिंचवड शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आगीच्या तब्बल 50 घटना घडल्या आहेत. यामध्ये घरांना लागलेल्या आगीच्या 20, तर मोकळ्या मैदानातील गवत, कचरा आणि झाडांना आग लागण्याच्या 25 घटनांचा समावेश आहे. तर फ्लेक्स, कंपाऊंड आणि टॉवरला आग लागण्याच्या 5 घटना घडल्या आहेत. सुदैवाने एकाही आगीच्या घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

नागपुरात 50 दुचाकी जळून खाक 

नागपुरात फटाक्यामुळे तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. सावरकर नगर येथे टीव्हीएस शोरुमला रात्री आग लागली. या आगीत 50 दुचाकी जळून खाक झाल्या. यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. फटाक्यामुळे शोरूममध्ये आग लागल्याची माहिती आहे.

मुंबई उपनगरातही आगीच्या घटना 

मुंबई उपनगरात काल रात्री तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. मुंबई उपनगरात जोगेश्वरी जेवीएलआर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ आग लागली. अंधेरीच्या मरोळ मिलिटरी रोड जवळही लेव्हल २ ची आग लागली होती. तसेच मालवणीमध्येही आगीची घटना घडली होती. मात्र या आगीच्या घटनांमध्ये कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. परंतु जोगेश्वरी जेवीएलआरची आग मोठी होती.

भिवंडीत आगीच्या 5 घटना

भिवंडीत दिवाळीतील लक्ष्मीपूजनानंतर फटाके फोडल्याने आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्री अकरा वाजेपर्यंत पाच ठिकाणी आग लागली. तर पहाटेच्या सुमारास कोंबड पाडा येथील पार्वती मंगल कार्यालय जळून खाक झालं आहे. या आगीमध्ये जीवितहानी जरी टळली असली, तरी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us