पुण्यात न्यायालयाच्या परिसरात भरदिवसा गोळीबार, सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, गृहखात्याकडे मोठी मागणी

पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर कोर्टाच्या गेट क्रमांक 4 बाहेर एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला आहे. यावर आता सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

पुण्यात न्यायालयाच्या परिसरात भरदिवसा गोळीबार, सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, गृहखात्याकडे मोठी मागणी
पुणे गोळीबार प्रकरणावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 25, 2026 | 3:02 PM

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर कोर्टाच्या गेट क्रमांक 4 बाहेर सहा जणांच्या टोळक्याकडून एकावर गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबाराचा नेम चुकल्यानंतर या टोळक्याकडून कोयत्याने देखील हल्ला करण्यात आला. या घटनेत संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. मंदार किवळे असं या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. विशेष म्हणजे मंदार किवळे  हा देखील एका हत्या प्रकरणातील आरोपी आहे. त्याला काही दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता, तो आपल्या काही कामासाठी न्यायालयात आला असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीप्रमाणे 20 एप्रिल 2025 रोजी पुण्यातील कात्रज परिसरातील संतोषनगर येथे जमिनीच्या आर्थिक वादातून शुभम सुभाष चव्हाण याचा खून करण्यात आला होता. मंदार किवळे हा याप्रकरणातील आरोपी आहे. चार दिवसापूर्वी तो कारागृहातून बाहेर आला होता. आज न्यायालयीन कामकाजासाठी आला असता,  त्याच्यावर आरोपींकडून हल्ला करण्यात आला आहे.  सहा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला, या हल्ल्यानंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाले आहेत. आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. दरम्यान आता या सर्व प्रकरणार खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी ट्विट करत ही घटना अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.

Loading...

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 

विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या पुण्याची ओळख आज गुन्हेगारीचे आणि दहशतीचे शहर अशी होत चालली आहे, ही अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी बाब आहे. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात आज भरदिवसा एका व्यक्तीवर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार करण्यात आले. ही घटना पुणेकरांच्या आणि एकंदरीत शहराच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. न्यायालय हे सर्वसामान्य माणसासाठी ‘न्यायदानाचे मंदिर’ असते. जिथे प्रत्येक नागरिक न्यायाच्या आणि संरक्षणाच्या अपेक्षेने येतो, त्याच पवित्र वास्तूच्या परिसरात जर भरदिवसा रक्ताचा सडा पडत असेल, तर सर्वसामान्य पुणेकरांनी कोणाकडे पाहायचे? विशेष म्हणजे, या परिसरात पोलीस चौकी आहे, सुरक्षा बंदोबस्त आहे आणि पोलिसांची सततची वर्दळ असते. तरीही भरदिवसा शस्त्रे घेऊन येण्याची आणि खून करण्याची हल्लेखोरांची हिंमत होतेच कशी?

गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही, हेच यावरून स्पष्ट होते. गेल्या काही काळापासून पुण्यात कोयता गँगची दहशत, गोळीबाराच्या घटना, भररस्त्यात होणारे खून आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था नावाची चीज पुण्यात शिल्लक उरली आहे की नाही, असा गंभीर प्रश्न आता प्रत्येक पुणेकर विचारत आहे. पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजले आहेत. जर न्यायालयासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणीच नागरिक सुरक्षित नसतील, तर शहरातील इतर भागांत राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या जीवाची हमी कोण घेणार?

पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे? गुन्हेगारांवर जरब बसवण्यात पुणे पोलीस आणि गृहखाते पूर्णपणे अपयशी ठरले आहे का? केवळ आश्वासने देऊन किंवा कागदोपत्री कारवाया करून शहरातील गुन्हेगारी थांबणार नाही. पुणे पोलीस आयुक्तांनी आणि राज्याच्या गृहखात्याने या घटनेचे गांभीर्य ओळखून यातील सर्व गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. तसेच, शहरातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था तातडीने पूर्वपदावर आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत, जेणेकरून सर्वसामान्य पुणेकरांना पुन्हा एकदा निर्भयपणे जगता येईल.’  असं ट्विट या प्रकरणात सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us