
नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल लागले असून राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठे यश मिळाले. काही ठिकाणी महायुती म्हणून निवडणुका लढल्या गेल्या तर काही ठिकाणी पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निकालामध्ये फक्त आणि फक्त महायुतीचाच बोलबाला बघायला मिळाला. शिवसेना एकनाथ शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर राज्यात राहिला. जोरदार कामगिरी शिवसेनेने केली. भरत गोगावले, शहाजी बापू पाटील आणि संतोष बांगर या शिवसेनेच्या नेत्यांनी अनेक अडचणीनंतर आपले गड कायम राखले. विशेष म्हणजे नागपूरमध्ये मोठे यश भाजपाला मिळाले. भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार कामगिरी या निवडणुकीमध्ये केली.
नुकताच देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी भाजपा हा नगरपरिषद पंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरल्याचे म्हटले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुतीने चांगली कामगिरी या निवडणुकीत केली आहे. नागपूरमध्ये भाजपाने अभूतपूर्व कामगिरी केली. 75 टक्के नगरसेवक हे आपल्या महायुतीने निवडून आले आहेत. महानविकास आघाडीचा विचार केला तर त्यांचे एकून 50 च्या आसपास नगराध्यक्ष निवडून आले.
आपले 210 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. यामुळे या निवडणुकीमध्ये आपण महाविकास आघाडीचा पूर्णपणे सफाया केला आहे, हे देखील याठिकाणी स्पष्ट होतंय. भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर पुन्हा एकदा सर्वात जास्त स्ट्राईक रेट आपला जास्त आहे. राज्यामध्ये भाजपाने एक रेकॉर्ड तयार केला आहे, ते म्हणजे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याचा.
मतदारांनी भाजपावर विश्वास दाखवला. मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच 2017 च्या निवडणुकीमध्ये आपणच 1 नंबर पक्ष होतो. यावेळी जवळपास 3 हजारांच्या वर नगरसेवक भाजपाचे निवडून आले आहेत. सहा पक्ष आणि इतक्या आघाड्या त्यामध्ये अपक्ष उमेदवार त्यामध्येही भाजपाने ही कामगिरी केली आहे. इतके जास्त नगरसेवक कोणत्याच पक्षाचे यापूर्वी निवडून आले नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.