भाजपच्या माजी आमदाराची मॉब लिंचिंग, 70-80 लोकांनी घरात घुसून मारलं
former mla atar singh bhadana no more after attack in rajasthan

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील क्रेशर प्लांटवरून रविवारी रक्तरंजित थरार झाला आहे. या वादात माजी आमदार, भाजप नेते अतर सिंह भडाना यांची मॉब लिंचिंग झाली. भडाना यांच्या घरात 70-80 लोकांनी घरात घुसून हल्ला केला आहे. या लोकांनी माजी आमदाराच्या सहकाऱ्यावर देखील हल्ला केला. या हल्ल्या माजी आमदार भडाना यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार अतर सिंह भडाना यांच्यावर भीषण हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या भडाना यांनी रात्री साडेअकरा वाजता जीव सोडला. या घटनेने गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. भडाना यांच्या मृत्यूनंतर गावात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
भडाना हे सायंकाळी साडेसहा वाजता क्रेशर प्लांट जवळ होते. मागील एक वर्षांपासून ते बंद पडलेला क्रेशर प्लांट पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत होते. या प्लांटवरूनच ग्रामीण भागात दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटात झालेली बाचाबाची थेट हाणामारीपर्यंत पोहोचली. अनेकांनी लाठी-काठीने माजी आमदार अतर सिंह भडाना यांच्यावर हल्ला केला. या वादात अतर सिंह भडाना आणि त्यांचे सहकारी गगन शर्मा देखील गंभीर जखमी झाले. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपाचारानंतर भडाना यांना जयपूरला पाठवण्यात आलं. तर गगन शर्मा यांना भरतपरला पाठवण्यात आलं. जयपूरमध्ये एसएमएस रुग्णालयात भडाना यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
माजी आमदार भडाना यांची पत्नी कमलेश यांनी या प्रकरणी पोलीस आणि प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी आरोप केला की, प्लांटचं लीज कनेक्शन कापण्यात आलं. पाण्याचा पंप खराब करण्यात आला होता. प्लांटच्या येथून अनेकांना पळवण्यात येत होते. कमलेश यांच्या दाव्यानुसार, या घटनेची माहिती पोलीस आणि प्रशासनाला दिली जात होती. परंतु कोणतीही कारवाई झालेली नाही.