मोठी बातमी! काँग्रेसमध्ये जायचं तर जा, शरद पवारांचा शिलेदार रोहित पवारांवर संतापला, पक्षात अंतर्गत वाद पेटला
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आमदार रोहित पवार नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत. मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटात वातावरण तापल्याचं पहायला मिळत आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आमदार रोहित पवार हे येत्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत. मात्र या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा नसल्याची चर्चा सुरू आहे. यावरून विविध तर्क व्यक्त केले जात आहेत. हे सर्व सुरू असतानाच आता दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटातील अतंर्गत वाद देखील समोर आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार रमेश कदम यांनी रोहित पवारांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. रोहित पवार यांची लायकी काय आहे? कोण आहे रोहित पवार? पवार आडनाव काढल्यास रोहित पवार झिरो आहेत? महाराष्ट्रात एकच दादा होऊन गेले, ते म्हणजे अजितदादा दुसरा दादा कदापी शक्य नाही, असं रमेश कदम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, कॅमेरा म्हणजे दुधारी तलवार आहे. कॅमेरा नसेल तर रोहित पवार ऑफिसमध्येही बसणार नाहीत. पहिल्या टर्मच्या आमदाराला विधिमंडळात एवढा वेळ बोलायला कसा मिळतो? पहिल्या टर्ममध्ये तर पाय लटपटतात, कामकाज शिकायला 5 वर्षे जातात. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे पहिल्या रांगेत बसतात, तरी रोहित पवारांना जाऊन नमस्कार करावासा वाटत नाही, पक्षाच्या प्रोटोकॉलला ते चॅलेंज करतात.
मी म्हणजे पार्टी आहे, असं भासवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, हे अजिबात चालणार नाही. त्यांच्या भाषणात कधी पवार साहेबांचं नाव, कधी राष्ट्रवादीचं नाव नसतं, हे चालणार नाही. सुप्रिया ताई नाराज आहेत, हे फक्त आम्ही मीडियात बोलत नाही, पण कार्यकर्त्यांमध्येही नाराजी आहे. तुमच्याकडे पैसा आहे, पण पैसा कामाला येणार नाही. तुमचं एकच भांडवल आहे, आडनावा मागे पवार आहे, असंही यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काँग्रेसमध्ये जायचं असेल तर जा, पण पक्षात घाण का करतायेत? राहुल गांधींनी भेट दिली, कारण आडनावामागे पवार आहे. ग्रामीण भागात आजही प्रत्येक मतदाराला फक्त पवार साहेब दिसतात, बाकी काही नाही. पुढच्या मोर्चात त्यांना पैसे देऊनच भाड्याने माणसं आणावी लागतील, असा हल्लाबोल यावेळी कदम यांनी केला आहे.