पंढरपुरात मोठा राडा! थेट रस्त्यावरच तलवारी, कोयते, काठ्यांनी दे दणादण हाणामारी, नेमकं काय घडलं?
ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरने साईड दिली नाही आणि दोन गटांमध्ये सुरू झाला रक्तरंजित संघर्ष! भर रस्त्यात तलवारी आणि कोयते निघाले. या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी झाले असून सांगोल्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

रवी लव्हेकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : पंढरपूरमधील सांगोल्यात दिवसाढवळ्या दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक राड्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने साईड न दिल्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद थेट तलवारी आणि कोयत्यांनी हल्ला करण्यापर्यंत पोहोचला. या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने साईड न दिल्याच्या कारणावरून वाद विकोपाला गेला. त्यानंतर दिवसाढवळ्या तलवारी, कोयते आणि काट्यांनी दोन गटांत मोठा राडा झाला. या छोट्याशा वादाचं रूपांतर थेट तलवार आणि कोयत्यांनी हल्ल्यात रुपांतरीत झालं. भर रस्त्यावर दोन्ही गटांकडून एकमेकांना बेदम मारहाण सुरु होती. या भीषण हाणामारीमध्ये ट्रॅक्टर चालकासह पाच जण गंभीर जखमी झाले आहे.
दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती
दरम्यान, या थरारक मारहाणीच्या घटनेमध्ये पाच गंभीर तर दोघांची तब्येत चिंताजनक आहे. या सर्व घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यात वाढत्या हाणामारीच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसा रस्त्यावरच तलवारी निघत असतील, तर गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला आहे का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
बातमी अपडेट होत आहे…
