
मुंबई : लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या आठवड्या भरावर येऊन ठेपले आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची(ganesh festival 2022) जोरदार तयारी सुरू आहे. अशातच चर्चा रंगली आहे ती भारत पाकिस्तान बॉर्डरवर साजरा होणाऱ्या गणेश उत्सवाची. भारत पाकिस्तान बॉर्डर(India Pakistan Border) साजरा होणाऱ्या या गणेशोत्सवासाठी मुंबईतून बाप्पाची मूर्ती नेली जाते. ही मूर्ती मुंबईतून बॉर्डरवर जाण्यासाठी रवाना झाली आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत ही मूर्ती बॉर्डरवर पोहोचवली जाते. बॉर्डरवर विराजमान होणार हा गणपती किंग ऑफ एलओसी(King of LoC) नावाने ओळखला जातो.
भारत पाक सीमेवरील एल ओ सी चा राजा या गणपती बाप्पाची मूर्ती मुंबईतून सीमेवर रवाना झाली आहे. भारत पाकिस्तान सीमेवर गणेशोत्सव साजरा केला जातो. या गणेशोत्सवासाठी मूर्ती दरवर्षी मुंबईतून नेली जाते. भारत पाक सीमेवर नेहमीच तणाव असतो या तणाव पूर्ण वातावरणात सीमेवरील सैनिक मोठ्या उत्साहात मागील 12 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहे. भारत पाक बॉर्डरवरील गणेशोत्सवाचे हे यंदाचे 13 वे वर्ष आहे.
यंदा ही भारत पाकिस्तान सीमेवर तणावपूर्ण वातावरण आहे. अजूनही पाकिस्तान होणारा गोळीबार सातत्याने सुरुच आहे. यात आपले सैनिक जखमी होत असतात. अशा वातावरणात देखील आपले सैनिक खडा पाहारा देत असतात. त्यामुळेच आपण आपले सण आनंदात साजरे करत असतो. अशा या सैनिक बांधवांना गणेशोत्सव साजरा करता यावा म्हणून काश्मीर च्या पुच्छ येथे किरण ईश्वर या काश्मिरी पंडित महिला गणेशोत्सव साजरा करत असतात.
मुंबईच्या कारखान्यात तयार झालेली बाप्पाची मूर्ती सुरक्षा व्यवस्थेत भारत पाक सीमेवर उत्सवासाठी पाठवली जाते. इशर दीदी दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाची मूर्ती घेण्सासाठी मुंबईत आल्या होत्या. मोठ्या जल्लोषात ही मूर्ती जम्मू काश्मिरसाठी रवाना झाली आहे. मुंबईहून गणपती बाप्पाची मूर्ती जम्मूत नेली जाणार असून, तिथून मग सैनिकांच्या सुरक्षेत पूँछपर्यंत बाप्पाची मूर्ती नेली जाणार आहे.
सैनिकांनाही बाप्पाचा आशीर्वाद घेता यावा याकरीता बॉर्डरवर हा गणेशोत्सव सुरु करण्यात आलाय. या बाप्पामुळे आपल्या सैनिकांना धीर मिळेल आणि बाप्पाच्या आशीर्वादामुळे सीमेवरील तणावही कमी होईल असे किरण ईश्वर यांचे म्हणणे आहे.