
कोकण आणि गणपती हे एक अनोखं नातं आहे. दरवर्षी लाखो चाकरमानी गणेशोत्सवात कोकणात जातात. यंदाही मुंबई, पुण्यासह ठिकठिकाणचे अनेक कोकणी कुटुंब हे गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. येत्या २७ ऑगस्ट २०२५ रोजी घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. त्यामुळे कोकणातील चाकरमान्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी सरकारने खास सुविधा केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ५,००० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये मोठी गर्दी झाली आहे. विविध रेल्वे स्थानके आणि एसटी डेपोवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ज्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण दिसून येत आहे. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने कंबर कसली आहे. कोकणवासीयांना गावी पोहोचवण्यासाठी ५,१०३ अतिरिक्त बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे. मुंबईतून तीन डेपोमधून ९७३ गाड्या कोकणासाठी रवाना होणार आहेत. यामध्ये कुर्ला डेपोतून ६९ गाड्या सोडण्यात येत आहेत. मुंबई, पनवेल, पालघर, रायगड येथून एकूण १,८०७ गाड्या सोडल्या जाणार आहेत.
गेल्या वर्षीपेक्षा यंदा एसटीचे बुकिंग वाढले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी गाड्यांची देखभाल करून त्या चालकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. रविवार असल्याने कुर्ला डेपोतून ७१ गाड्या सोडण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे ठाणे रेल्वे स्थानकात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे. मांडवी एक्सप्रेस पकडण्यासाठी प्रवाशांनी २४ तास आधीच लांबच लांब रांगा लावल्या आहेत. मांडवी एक्सप्रेस उशिराने धावत आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
यासोबतच अनेक राजकीय नेत्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणवासीयांसाठी विशेष गाड्यांची सोय केली आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एक्सप्रेस दादर येथून दुपारी १.३० वाजता कोकणासाठी सुटणार आहे. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. भाजप नेते नितेश राणे यांनीही दादर रेल्वे स्थानकावरून मोदी एक्सप्रेस नावाची दोन विशेष ट्रेन सोडल्या आहेत. या ट्रेनच्या माध्यमातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोफत प्रवासाची सोय करण्यात आली आहे. यात जेवण आणि पाण्याचीही व्यवस्था आहे.
नितेश राणे यांनी दादर स्थानकाबाहेर मोदी एक्सप्रेसचा डबल धमाका… चाकरमान्यांनो येतोय ना गणपतीक अशा आशयाचे बॅनर लावत मोठे शक्ती प्रदर्शन केले आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचेही फोटो आहेत. ‘मोदी एक्सप्रेस’ मुळे अनेक प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मोफत सेवा मिळत असल्याने अनेक मुंबईकर आपल्या मुलाबाळांसह प्रवास करत आहेत. काही प्रवाशांनी या सेवेबद्दल सरकारचे आभार मानले आहेत. तर काहींनी नियोजन योग्य नसल्याने तिकिटे मिळत नसल्याची तक्रार केली आहे.
मीरा-भाईंदरमधून गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खास गाड्यांची व्यवस्था केली आहे. मात्र काँग्रेसचे युवा जिल्हा अध्यक्ष सिद्धेश राणे यांनी या गाड्यांच्या चालक आणि मालकांच्या राहण्याची सोय केलेली नाही. तसेच जेवणाची कोणतीही सोय नाही. ही योजना केवळ दिखाऊपणा आहे, असा दावा सिद्धेश राणे यांनी केला आहे.
दरम्यान गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी येत आहे. यामुळे पालघर येथे जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक पार पडली. पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी शांतता समित्यांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वधर्मीय धर्मगुरूंची मते जाणून घेतली. दोन्ही सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केले.