
“मी काल मुंबईला येत असताना मोर्चाला सामोरा गेलो. त्यांच्याशी चर्चा केली. मोर्चा थांबवावा अशी विनंती केली. मागे सुद्धा मोर्चाला आला, त्यावेळी मी त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांचं आज आठ ते नऊ जणांचं शिष्टमंडळ मंत्रालयात येईल. ज्या खात्याशी संबंधित प्रश्न आहेत, आदिवासी, महसूल, शिक्षण ज्या खात्याशी संबंधित प्रश्न असतील, त्यांचे प्रधान सचिव, अधिकारी बैठकीला उपस्थित राहतील. त्यांचे प्रश्न समजून घेतील. जे प्रश्न तात्काळ सोडवण्यासारखे आहेत ते लगेच सोडवू” असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले. माकपचा शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च मुंबईच्या दिशेने येत आहे. त्यावर ते बोलले. ‘मोर्चा एवढा मोठा आहे. मनधरणी, चर्चा करावी लागते. सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे’ असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
काल देशभरात 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नाशिकमध्ये ध्वजवंदनानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणामुळे नवा वाद पेटला आहे. महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने वन विभागाच्या माधवी जाधव या महिला कर्मचाऱ्याने आक्षेप घेतला. माधवी जाधव यांनी आपला संताप मीडियासमोर व्यक्त केला. आज गिरीश महाजन यांनी यावर स्पष्टीकरण दिलं.
मी राज्यातील एकमेव मंत्री असेन, त्या दिवशी…
नाशिकमध्ये तुमच्यावर आरोप करण्यात आले. तुम्ही माफी मागितली तरी काही संघटना तुमच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. यावर गिरीश महाजन म्हणाले की, “मागणी कोणीही काहीही करु शकतं. त्यात दुमत नाही. कालही खुलासा केला. काल माझ्याकडून जे झालं ते अनावधानाने झालं. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता” “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. माझ्या गावात एकही पुतळा नव्हता. मी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारले. आंबेडकर जयंतीला मी राज्यातील एकमेव मंत्री असेन, त्या दिवशी पूर्णवेळ निळा शर्ट घालतो, लेझीमच्या तालावर नाचतो, ट्रॅक्टर चालवतो. हवं तर माझ्या मतदारसंघात जिल्ह्यात जाऊन विचारा” असं स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिलं.
..तर माझा नाईलाज
“इतकं चांगलं वातावरण आमच्याकडे आहे. माझ्याकडून एखादा शब्द राहून गेला तर त्या बद्दल राजीनामा द्या, अॅट्रोसिटी दाखल करा असं म्हटलं जातय. मी शेकडो, हजारो लोकांना दलित बांधवांना मुंबईत आणलं. मुंबईत आणून त्यांच्यावर औषधोपचार केले. सगळ्या समाजाच्या माणसांना मी मदत करतो. एकही जण तुम्हाला सांगणार नाही की, मी चुकीचा वागतो. मला बाबासाहेबांबद्दल नितांत आदर आहे. मी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली. कोणाला राजकारण करायचं असेल तर माझा नाईलाज आहे” असं गिरीश महाजन म्हणाले.