Gokul Satej Patil : ‘मला कसाही वेढा घालू दे, पण मी..’ गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी सतेज पाटील यांचं महत्वपूर्ण भाष्य
Gokul Satej Patil : गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा टि्वस्ट निर्माण झाला आहे. काल राज्य सरकारने गोकुळवर राज्य शासनाचे चार संचालक नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

मागच्या काही दिवसांपासून गोकुळची निवडणूक चर्चेत आहे. कोल्हापूरातील प्रतिष्ठेच्या गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला 13 जागा मिळाल्या आहेत. तेच महायुतीच्या पॅनलला 12 जागा मिळाल्या आहेत. निसटतं बहुमत का होईना ते सतेज पाटील यांच्या आघाडीकडे आहे. त्यामुळे सतेज पाटील यांच्या आघाडीकडून गोकुळचं अध्यक्षपद मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण महायुतीचे नेते हार मानायला तयार नाहीयत. काल राज्य सरकारने गोकुळ संदर्भात एक मोठा निर्णय घेतला. त्यामुळे सतेज पाटील यांच्या आघाडीसमोरच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. गोकुळवर चार शासन नियुक्त संचालक नेमण्यात येणार आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांनी कॅबिनेट बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती दिली. यात चार राजकीय आणि एक शासकीय संचालक असणार आहेत. या संचालकांना मतदानाचा अधिकार असणार आहे.
सतेज पाटील यांच्या आघाडीकडे आणि महायुतीच्या जागांमध्ये फक्त एका जागेचं अंतर आहे. त्यात चार राजकीय संचालक असल्याने गोकुळचं अध्यक्षपद महायुतीकडे जाऊ शकतं. आता सतेज पाटील यांनी यावर भाष्य केलं आहे. “गोकुळ मध्ये मला घातलेल्या वेढ्यातून,मी बाहेर पडणार” असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे. “गोकुळ मध्ये कसा ही वेढा पडू दे,कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा ही वेढा असला तरी,कसं बाहेर पडायचे ही शिकवण आम्हला दिलेली आहे”असं विधान आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघातील राजकारणावरून केलं आहे. सांगलीच्या बावची येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक कधी?
गोकुळवर संचालक नेमण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड कायदेशीर कचाट्यात अडकण्याची शक्यता जास्त आहे. गोकुळमध्ये अध्यक्ष निवडीसाठी 14 चा कोरम लागतो. पण सतेज पाटील यांच्या मते हा तांत्रिक मुद्दा आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 10 नोव्हेंबरला गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकते.