
सांगलीतील मिरजेमध्ये मालगाडीचे डब्बे रेल्वे रुळावरुन घसरल्याची घटना घडली आहे. यामुळे मिरजहून पुणे मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प झाली आहे. हे मालगाडीचे डब्बे रात्री आणि दुपारी असे दोन वेळा घसरल्याची घटना समोर आली आहे. यामुळे प्रवाशी संतप्त झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरज रेल्वे स्टेशनजवळील गुड शेड जवळ मालवाहतूक करणारा मोकळा डब्बा आज रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. ही घटना घडल्यानंतर रेल्वेचा अलर्ट करणारा भोंगा वाजला. त्यानंतर रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलिसांनी गुड शेड रेल्वे मार्गावर धाव घेतली.
हुबळीकडून पुण्याकडे मालवाहतूक रेल्वे जात असताना एका रेल्वेच्या डब्ब्याची चाके रुळावरून घसरली होती. या घटनेमुळे मिरजहून पुणे मुंबईकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्हीही रेल्वे गाड्या सुमारे दोन तास ठप्प झाल्या होत्या. आता दोन तासाने ही रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कालही रेल्वेच्या एका डब्ब्याची चाके रुळावरून घसरल्याची घटना घडली होती.