गुलाबराव देवकरांना आतमध्ये जावंच लागेल… गुलाबराव पाटील यांचा थेट इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्या अजित पवार गटात सामील होण्याच्या निर्णयानंतर भ्रष्टाचाराचे आरोप समोर आले आहेत. जिल्हा बँकेतून घेतलेले दहा कोटींचे कर्ज आणि इतर आर्थिक अनियमिततांच्या तक्रारींचा उल्लेख करून मंत्री गुलाबराव पाटील यांनी देवकर यांना तीव्र इशारा दिला आहे.

गुलाबराव देवकरांना आतमध्ये जावंच लागेल... गुलाबराव पाटील यांचा थेट इशारा
gulabrao patil gulabrao devkar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 27, 2025 | 5:09 PM

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांच्याविरोधात निवडणूक आयोग , ॲन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांच्या रखडलेल्या पक्षप्रवेशावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी गुलाबराव देवकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहेत. मात्र अनेक दिवसांपासून त्यांचा पक्षप्रवेश रखडला आहे. यावर आता शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांना थेट इशारा दिला आहे. कोणत्याही पक्षात गेले तरी गुलाबराव देवकरांना आतमध्ये जावंच लागेल, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

गुलाबराव देवकर यांना कोणताच पक्ष स्वीकारणार नाही

निवडणुकीसाठी जिल्हा बँकेतून गुलाबराव देवकरांनी दहा कोटींचं कर्ज काढल्याचं उघडकीस आला आहे. निवडणुकीच्या काळात कर्ज काढून कॅश इन हॅन्ड ठेवणं ही अत्यंत चुकीची बाब आहे. याबाबत निवडणूक आयोग व अँटी करप्शनकडे तक्रार करणार आहे, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. जिल्हा बँकेचा कर्ज घेऊन न फेडणे, इतर बँकांचे घेतलेले कर्ज, मजूर फेडरेशनच्या माध्यमातून मजुरांचे पैसे खाल्ले असतील, स्वतःच्या शालेय शिक्षण संस्थेतील शिक्षकांचा पगार न देणे असेल, तसेच कायद्याच्या चौकटीबाहेर 26 लाख रुपये भाड्याने देणे असेल, या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर गुलाबराव देवकर यांना कोणताच पक्ष स्वीकारणार नाही. ते कोणत्याही पक्षात गेले तरी गुलाबराव देवकरांना आतमध्ये जावंच लागेल, असा थेट इशारा शब्दात मंत्री गुलाबराव पाटलांनी देवकर यांना दिला आहे.

जिल्हा बँकेतून दहा कोटींचे कर्ज घेतले

गुलाबराव देवकर यांनी अध्यक्ष असताना जिल्हा बँकेतून दहा कोटींचे कर्ज घेतले होते. बॅकेचे संचालक सुरेश पाटील यांनी सहकार विभागाकडे तक्रार केली आहे. याप्रकरणात गुलाबराव देवकर यांची चौकशी सुरु आहे. याच प्रकरणावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकरांना कोणताही पक्ष घेणार नाही, त्यांना आतमध्ये जावंच लागेल असा इशारा दिला आहे.