तुकाराम मुंडेंचा सर्वात मोठा निर्णय, …तर आता थेट होणार मकोका अंतर्गत कारवाई, आदेशाने विक्रेत्यांचे धाबे दणाणले

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी राज्यात कारवाईचा धडका लावला आहे. मुंडे यांच्या कारवाईमुळे भेसळयुक्त पदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

तुकाराम मुंडेंचा सर्वात मोठा निर्णय, ...तर आता थेट होणार मकोका अंतर्गत कारवाई, आदेशाने विक्रेत्यांचे धाबे दणाणले
तुकाराम मुंडे यांचा मोठा निर्णय
Image Credit source: टीव्ही 9 हिंदी
| Updated on: Jun 12, 2026 | 7:08 PM

तुकाराम मुंडे यांची राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांनी कारवाईचा धडका लावला आहे.  अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. लाखो रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला आहे. तुकाराम मुंडे यांनी उगारलेल्या कारवाईच्या बडग्यामुळे भेसळयुक्त अन्न-पदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. आतापर्यंत अशा पद्धतीने अन्न-पदार्थांची विक्री करणाऱ्या अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाकडून ग्राहकांना भेसयुक्त अन्न पदार्थांची माहिती देणं सोपं व्हावं, यासाठी एक हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे.

दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे  राज्यातील गुटखा माफियांवर आता थेट मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे.  अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश दिले आहेत.  गुटखा, तंबाखू, निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध  वापाराला प्रतिबंध घालण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाकडून हे मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. केवळ विक्रेतेच नव्हे तर उत्पादक, पुरवठादार, वाहतूकदारांवरही कारवाई होणार आहे. यामधून कोणाचीही सुटका होणार नाही, असा इशाराच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.  गोदाम चालक आणि घाऊक तसेच किरकोळ विक्रेतेही एफडीएच्या रडावर असणार आहेत. प्रतिबंधित अन्नपदार्थांचा व्यापार आता संघटित गुन्हा मानला जाणार आहे, जर अशा अन्नपदार्थांचा व्यापार कोणी करत असेल तर त्याच्यावर आता थेट मकोका अतंर्गत कारवाई होणार आहे.

त्यामुळे आता गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू-मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्क्सविरुद्ध पात्र प्रकरणांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ म्हणजेच मकोका लागू करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सर्व क्षेत्रीत अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us