पालिकेचे पालकत्व पाहून डोळे पाणावले, 200 हून अधिक जणांना मिळाला “आसरा”

पावसाळ्यात ही मोहीम अधिक सजगतेने राबवण्यात येत असून तपोवनमध्ये बेघर निवारा केंद्रात सध्या 102 लाभार्थी असून त्यापैकी 19 जणांचे पुनवर्सन करण्यात आले आहे.

पालिकेचे पालकत्व पाहून डोळे पाणावले, 200 हून अधिक जणांना मिळाला आसरा
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 23, 2022 | 2:37 PM

नाशिक : नाशिक महानगर (NMC) पालिकेने केलेल्या एका मदतीचे तोंड भरून कौतुक होत आहे. खरतर महानगर पालिकेला नेहमीच कुठल्या ना कुठल्या कामावरून नागरिकांच्या टीकेला सामोरे जावे लागत असते. मात्र, पालिकेने केलेली एक मदत मोठा कौतुकाचा विषय ठरत आहे. नाशिक (Nashik) महानगरपालिकेकडुन बेघरांचे सर्व्हेक्षण मागे करण्यात आले होते. त्यानुसार नाशिक महानगर पालिकेकडून बेघर झालेल्यांना मनपाच्या निवारा केंद्राचा आधार दिला जात आहे. नाशिक मनपाकडून त्यांना बँक (Bank) खात्यासह आधार कार्ड काढून दिले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असलेली समस्या मार्गी लागत असल्याने पालिकेच्या या कामाचे कौतुक होत आहे. संत गाडगे महाराज शाळा आणि इंद्रकुड येथे सुमारे 150 ते 200 बेघरांना निवारा आणि भोजन पुरविण्यात येत आहे.

पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने शहरातील मुंबई नाका, द्वारका इत्यादी मुख्य चौक, सिग्नल या ठिकाणी बेघर शोध मोहिम घेऊन लाभार्थ्यांना निवारा केंद्रात दाखल केले जात आहे.

पालिका उपायुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या सहाही विभागात सहा पथकांद्वारे ही मोहीम राबवली जात आहे.

पावसाळ्यात ही मोहीम अधिक सजगतेने राबवण्यात येत असून तपोवनमध्ये बेघर निवारा केंद्रात सध्या 102 लाभार्थी असून त्यापैकी 19 जणांचे पुनवर्सन करण्यात आले आहे.

गंगाघाट येथील संत गाडगे महाराज बेघर निवारा केंद्रात सध्या 68 लाभार्थी असून त्यापैकी 26 जणांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

चहा, नाष्टा आणि दोन वेळेचे मोफत जेवण बरोबरच लाभार्थीची दरमहा आरोग्य तपासणी करण्यात येते आहे.

मानसिक आरोग्य शिबीर घेण्यात येते दर महिन्याला केशकर्तनही केले जात आहे. मास्क, सॅनिटासझरचेही वाटप करण्यात आले आहे.

आधार कार्ड काढले जाते. सदर निवारा केंद्रात रक्षाबंधन, गणेशोत्सव, गुढी पाडवा या सणाबरोबरच स्वातंत्र दिन आदी राष्ट्रीय सण समारंभ देखील साजरे केले जातात.

आत्तापर्यंत सुमार 45 बेघर नागरिक व त्यांचे कुटुंबाचे समुपदेशन करून त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे.

भविष्यात जास्तीत जास्त लाभार्थ्यांचे पुनर्वसन करणे तसेच बेघर लाभार्थ्यांना नर्सरी, कागदी पिशव्या, द्रोण बनवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचा मानस पालिकेचा आहे.