
राज्य सरकारने हिंदी भाषा लागू करण्याबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. त्रिभाषा सूत्राअंतर्गत राज्य सरकारने तिसरी भाषा म्हणून इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता हा निर्णय रद्द केल्यानंतर सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. या समितीअंतर्गत तिसरी भाषा म्हणून कोणती भाषा लागू करावी? यावर अभ्यास केला जाणार आहे. दरम्यान, या निर्णयानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी माणूस एकत्र आला तर काय होऊ शतकं, याचा संदेश देशात गेला आहे, असे देशपांडे म्हणाले.
मराठी माणसाचा विजय आहे. मराठी माणसाच्या दबावापुढे सरकार झुकलं आहे. मराठी माणूस एकत्र आला तर काय होऊ शकतं. हा संदेश जायचा होता तो देशात गेला आहे. आताच्या सरकारने जीआर काढला होता. तो रद्द करणं गरजेचं होतं. मराठी माणसाच्या एकजुटीने हा रद्द झाला आहे. राज ठाकरेंनी या सर्व गोष्टी देशासमोर मराठी माणसासमोर ठेवल्या. मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय झाला आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले.
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी त्रिभाषा सूत्राअंर्गत तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला होता. इयत्ता पाहिलीपासूनच ही भाषा शिकवली जाणार होती. विरोधकांनी सरकारच्या याच धोरणाला विरोध केला होता. काहीही झालं तरी आम्ही हिंदीची सक्ती होऊ देणार नाही, असी भूमिका मनसे, ठाकरे गट, काँग्रेस तसेच इतर पक्षांनी घेतली होती. त्यानंतर आता हा विरोध पाहता सरकारने जारी केलेले दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. तसेच डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या इतर सदस्यांची नावे लवकरच जाहीर केले जाणार आहेत. तसेच या समितीच्या अहवालानंतर त्रिभाषाबाबत नेमकं काय करायचं? कोणती भाषा लागू करायची, हे ठरवले जाणार आहे.
दरम्यान, पाच जुलै रोजी मनसे, ठाकरे गट तसेच इतर पक्षांचा मोर्चा होणार होता. हा मोर्चा आता होणार आहे. पण त्याचे स्वरुप दुसरे असेल. ही विजयी सभा असेल असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यानंतर आता मनसे या सभेत सहभागी होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठऱणार आहे.