…म्हणून सरकारने त्रिभाषा सूत्राचा जीआर रद्द केला; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, पहिली प्रतिक्रिया समोर

राज्य सरकारने अखेर त्रिभाषा सूत्राचा जीआर मागे घेतला आहे, यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

...म्हणून सरकारने त्रिभाषा सूत्राचा जीआर रद्द केला; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, पहिली प्रतिक्रिया समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 29, 2025 | 8:38 PM

राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही निर्णय मागे घेण्यात आले आहेत. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी यावरून पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

आज पूर्ण राज्यभर हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन केलं. सर्व मराठी भाषिकांनी केलं. सरकारने काढलेल्या अजब जीआरची होळी केली. मराठी भाषा समितीने जे आंदोलन केलं होतं, त्याता मी सहभागी झालो. आज महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आंदोलन झालं. मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची शक्ती हरली आहे.  सक्ती हरली आहे. मराठी माणसाने ताकद दाखवली तर सरकार मागे हटतं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात असंच घडलं होतं, सर्व नेते पक्ष भेद विसरून एकत्र आले होते. तेव्हा हा डाव उधळला होता. आताही तो डाव उधळला आहे. एका गोष्टीचं वैषम्य वाटतं, सरकारने मराठी माणसाला फोडण्याचा प्रयत्न केला. एकजूट तोडण्याचा प्रयत्न केला. मराठी आणि अमराठी असं करण्याचा प्रयत्न केला. तसा भाजपचा प्रयत्न होता.

मराठी माणसात विभागणी करायची आणि मराठी अमराठी असं करून अमराठी मतं भाजपकडे खेचायची असा त्यातला भाजपचा छुपा अजेंडा होता. पण समाधानाची गोष्ट अशी की मराठी माणसाने समंजसपणाची भूमिका घेतली. भाषेला विरोध नाही तर सक्तीला विरोध आहे. सक्तीच्या विरोधात आंदोलन असल्याने त्यात फूट पडली नाही. मराठी माणसाची फूट लाभदायक ठरेल असं सरकारला वाटलं होतं. आज आंदोलन केल्यावर मराठी माणूस एवढा एकवटेल असं वाटलं नव्हतं सरकारला. ५ तारखेला मोर्चा होऊ नये, तो मोर्चा फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. म्हणून त्यांनी तो जीआर रद्द केला, असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान दुसरीकडे मनसेकडून देखील या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे.