
राज्यातील विविध भागात बिबट्यांचे दर्शन होत आहे. खासकरून पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि सह्याद्रीच्या कडेला बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने अनेक ठिकाणी पिंजरे लावले असून बिबट्यांना पकडण्याचे काम सुरू आहे. अशातच आता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बिबट्याला आवर कसा घालायचा याबाबत नामी उपाय सांगितला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात वाढलेल्या बिबट्याच्या संख्येबाबत बोलताना म्हटले की, यावर नसबंदी हा पर्याय आहे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मुंबईत सुद्धा अशा गोष्टी घडत होत्या. 2014 नंतर मुंबईत आता पर्यंत अशा घटना घडल्या नाहीत. मी वनमंत्री असताना उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला. दुसरा बिबट सफारी हा मार्ग आहे, मी केली होती. काही ठिकाणी बिबटे मागितले असतील तर दिले पाहिजे. बिबटे रेस्क्यू करण्यासाठी काही लोक मानधनावर नियुक्त करण्याची योजना आहे, मात्र आता त्यासाठी निधी नाही. निधी उपलब्ध केला पाहिजे.
वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, गणेश नाईक माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, त्यांना काय सल्ला देऊ. बिबटे रेस्क्यू करण्यासाठी तरूणांची गावात होते. त्या योजनेला निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. जुन्नरमध्ये बिबट सफारीत जास्त बिबटे राहिले पाहिजे. त्यांची नसबंदी केली पाहिजे. इतर राज्यांनाही बिबटे दिले पाहिजे. हे काम करताना त्यांचं चक्र सुद्धा ठेवता आलं पाहिजे. नसबंदी करताना बॅलन्स करता आले पाहिजे.
राज्यात बिबट्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे त्यांची नसबंदी करण्याची मागणी होत आहे. अशातच आता बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं आहे. सुरुवातीला जुन्नर तालुक्यात बिबट्यांची नसबंदी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पुण्यातील जुन्नर, शिरूरसह अहिल्यानगर आणि नाशिकमध्येही बिबट्यांची संख्या वाढल्याने या भागातही नसबंदी केली जाण्याची शक्यता आहे.