…तर अशोक सराफ मुख्यमंत्री असते, राज ठाकरे यांनी सांगितलं

मोठ्या माणसांचा सत्कार करायला मोठी माणसं राहिलेली नाहीत. त्यामुळं आमच्यावर आटोपावं लागते.

...तर अशोक सराफ मुख्यमंत्री असते, राज ठाकरे यांनी सांगितलं
राज ठाकरे
| Updated on: Jan 08, 2023 | 8:02 PM

पुणे : पुण्यात राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात आला. अशोक सराफ यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त हा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, प्रशांत दामले यांनी साडेबारा हजार प्रयोग केले. अशोक सराफ यांनी नाटक, चित्रपट, सिरीअल येथे काम केलंय. आता फक्त ओटीटी प्लॅटफार्म राहिलाय. इतकी वर्षे हे कलाकार काम करतात. अशोक सराफ ही व्यक्ती दक्षिणेत असती तर आजे ते मुख्यमंत्री असते. ४० फूट कटआउटवर तुमच्यावर दूध टाकलं गेलं असतं. आपल्याकडं कलावंत आहे का ठीक आहे. येवढ्यावर आपल्याकडं आटोपलं जातं.

कलाकाराचं महत्त्व काय असतं हे परदेशात गेल्याशिवाय कळतं नाही. रोममध्ये लिओवार्दी द विंची च्या नावानं एअरपोर्ट असतो. आपल्याकडं कलावंतांच्या नावानं चौक असतात, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. प्रतिमा जेवढ्या जपल्या जातात तेवढ्या प्रतीभा जपल्या जात नाहीत. कलावंत म्हणून मी नेहमीच त्यांचा आदर करत आलो.

अशोक सराफ यांचं मूळ घराण बेळगावचं असल्याचं आज कळलं. जन्म मुंबईचा. मला असं वाटतं खरा सीमाप्रश्न तुम्ही सोडविलात, अशी मिश्किल्लीही राज ठाकरे यांनी केली.

प्रशांत दामले आणि अशोक सराफ हे दोन्ही माझे आवडते कलाकार आहेत. मोठ्या माणसांचा सत्कार करायला मोठी माणसं राहिलेली नाहीत. त्यामुळं आमच्यावर आटोपावं लागते.

तुम्ही युरोपमध्ये असता तर आज या व्यासपीठावर देशाचा पंतप्रधान तुमचा सत्कार करायला असता. कलावंताची काय गरज असते ते आपल्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

कलावंत, दिग्दर्शक, पेंटर, आर्टिस्ट, कवी, संगीतकार, नाट्य, चित्रपट नसतं तर काय झालं असतं, असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला. हे लोकं नसते तर आपल्या देशात अराजक आलं असतं, असा धोकाही राज ठाकरे यांनी व्यक्त केला.