
संपूर्ण देशात हिवाळ्याला सुरुवात झाली असून काही ठिकाणी तापमानात मोठी घसरण पहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. अशातच आता हवामान विभागाने दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील इतर राज्यांना कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे. रविवारी म्हणजे उद्या हाडं गोठवणारी थंडी पडणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. या काळात राजधीनी दिल्ली-एनसीआरमध्ये किमान तापमान 3.9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. तसेच काही दिवस दाट धुक्याची चादरही पहायला मिळण्याची शक्यता आहे.
राजधानी दिल्लीवर दुहेरी संकट ओढवले आहे. दिल्लीतील लोक आधीच प्रदूषणाने त्रस्त आहेत, आता थंडी वाढणार असल्याची दिल्लीकरांची चिंता आणखी वाढली आहे. दिल्लीचा AQI 333 वर पोहोचला आहे. याचा अर्थ हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’ श्रेणीत आहे. तसेच दिल्लीत धुक्याचे प्रमाणही वाढले आहे. अशातच आता रविवारी दिल्लीतील तापमान आणखी घसरणार असल्याने दिल्लीकरांची चिंता वाढली आहे.
उत्तर भारतातील प्रमुख राज्य उत्तर प्रदेशात थंडीची तीव्र लाट पहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात उत्तर प्रदेशात किमान तापमान 4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. येत्या काही दिवसांत हे तापमान आणखी कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राजस्थानच्या जयपूर, अजमेर आणि कोटा येथे रात्रीच्या तापमानात 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. मात्र आगामी काळात हे तापमान 5 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतातील वरच्या भागातून एक नवीन कमकुवत पश्चिमी विक्षोभ जात आहे, ज्यामुळे राजस्थानच्या काही भागात तापमान कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आयएमडीकडून वरील सर्व राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील तापमानात घट झाली आहे. या दोन्ही ठिकाणी तापमान 9 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. आता 7 डिसेंबरला नागपूर, गोंदिया आणि यवतमाळला शीत लहरींचा अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागात किमान तापमान 12 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.