
यंदा मान्सून देशासह राज्यात वेळेपूर्वीच दाखल झाला, सामान्यपणे मान्सून महाराष्ट्रात सात जून रोजी दाखल होतो, मात्र मान्सून 25 मे रोजीच राज्यात दाखल झाला होता.यावर्षी राज्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे, मात्र पावसाचं हे प्रमाण असमान आहे. विदर्भ आणि कोकणात जोरदार पाऊस झाला, मात्र मराठवाड्याला अजूनही चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अति अल्प पाऊस झाला आहे. चांगला पाऊस झाला नसल्यामुळे पिके संकटात सापडली आहेत, आता आणखी एक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार मध्य भारत आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं शनिवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सूनची अवस्था सध्या कमजोर झाली आहे. पुढील दोन आठवडे तरी राज्यात अशीच स्थिती कायम राहणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सून ट्रफ आपल्या सामान्य स्थानापेक्षा अधिक उत्तरेकडे सरकरल्यानं मध्य भारत आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं, तर दुसरीकडे दक्षिण भारतात मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे.
याबाबत बोलताना आयएमडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, मान्सून ट्रफ उत्तरेकडे सरकण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या ते हिमालयाच्या पायथ्याशी सक्रिय आहेत, त्यामुळे सध्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशात आणि पूर्वोत्तर राज्यात चांगला पाऊस पडत आहे. मात्र दुसरीकडे मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मान्सून ठप्प झाला आहे. सहा ऑगस्टनंतर दक्षिण भारतात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होऊ शकतो.
शेतकऱ्यांची चिंता वाढणार
दरम्यान पिकांना सध्या पावसाची आवश्यकता आहे, ऐन हंगामामध्ये पावसाचा जोर ओसरल्यास याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसू शकतो. मराठवाड्यात भीषण अवस्था आहे. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये अजूनही म्हणावा असा पाऊस झालेला नाही. आता त्यात भर म्हणजे जर दोन आठवडे पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.