इम्तियाज जलील यांना सर्वात मोठा धक्का, थेट मंत्र्यानेच केली सहआरोपी करण्याची मागणी; निदा खान प्रकरणात मोठा ट्विस्ट
Imtiaz Jaleel : नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांना सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खानला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राजकीय पक्ष एमआयएमचा हात असल्याचा आरोप कॅबिनेट मंत्री संजय शिरसाठ यांनी केला आहे. तसेच माजी खासदार इम्तियाज जलील यांची चौकशी करून त्यांनी सह आरोपी करा अशी मागणीही संजय शिरसाट यांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
निदा खानला पाठिंबा होता
संजय शिरसाट यांनी म्हटले की, ‘निदा खानला ज्या भागातून अटक करण्यात आली, तो भाग अत्यंत संवेदनशील असून तिथे ड्रग्ज आणि अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालतात. नारेगाव हे नशेखोरांचे केंद्र बनले आहे. निदा खान ही तिथे एकटी नव्हती, तिला कोणाचा तरी मोठा पाठिंबा होता. मुंब्रा आणि पुणे यांसारख्या शहरांतून अशा प्रवृत्ती वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदूंचा द्वेष करणे आणि धर्मांधता पसरवणे हे चुकीचे असून, या प्रकरणातील मोहोरे पकडले गेले असले तरी मास्टरमाइंड कोण आहे याचा तपास होणे गरजेचे आहे.’
निदा खानला पाठिंबा का दिला जातो?
निदा खान प्रकरणी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी भाष्य केले होते. यावर बोलताना शिरसाट यांनी म्हटले की, ‘निदा खानला पाठिंबा का दिला जात आहे? ती महिला नाशिकवरून थेट संभाजीनगरला कशी पोहोचली? ती गर्भवती असल्याची अफवा पसरवण्यात आली, मात्र त्यात तथ्य नव्हते. जलील आणि एमआयएमच्या नगरसेवकांच्या भूमिकेची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी संजय शिरसाठ यांनी केली होती.
इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा
संजय शिरसाट यांनी म्हटले की, ‘काल मी म्हटले होतं की इम्तियाज जलीलचा या प्रकरणात हात आहे. निदाच्या आईला व मावशीला अटक केली होती. ज्या रूममधून त्यांना अटक केली ती एका नगरसेवकाची आहे. जलील यांचं नाव घेण्याच कारण असं की, त्यांनी नाशिकला जाऊन निदा खानची पाठराखण केली होती. एखादा आरोपी जेव्हा निष्पन्न होतो, तेव्हा त्याला लपवणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. हा गुन्हा इम्तियाज जलील आणि एमआयएम पार्टीच्या लोकांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना आता सहआरोपी केलं पाहिजे. त्यांच्यावर एसआयटीची चौकशी मुख्यमंत्र्यांना सांगून मी लावणार आहे. सहआरोपी केलं नाही तर यांची हिंमत वाढेल. जातीवादाच विष पेरण्याचं काम हा जलील करत आहे’ असा आरोपही शिरसाट यांनी केला आहे.