
Imtiaz Jaleel Vs Sanjay Shirsat : माजी खासदार तथा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्याविरोधात आंबेडकरी संघटनांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला आहे. जलील यांनी वापरलेल्या हरिजन या शब्दावर आक्षेप घेत हा मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान, मंत्री तथा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यावर केलेल्या आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व करण्यात येत आहे. मी सर्व जातीधर्मांचा आदर करतो, असे जलील यांनी म्हटले आहे. तसेच मी आता शिरसाट यांच्या रात्री स्वप्नात येतो. रात्री ते उठून बसतात, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
संजय शिरसाट यांच्यावर जे आरोप केले होते. त्याची सर्व कागदपत्रं मी तपास संस्था, पत्रकार यांना दिले होते. मी उपस्थित केलेल्या आरोपांचे उत्तर देऊ शकत नाही हे समजल्यावर शिरसाट यांनी हे हत्यार उपसले आहे. शिरसाट हे एससी समाजाचे स्वयंघोषित नेते आहेत. इम्तियाज जलील हे जातीयवादी आहेत, असं वातावरण शिरसाट यांनी तयार केलं आहे. मी या शहराचा आमदार, खासदार होतो. मी जातीयवादी आहे, असं कोणीही माझ्याकडे बोट दाखवून सांगू शकत नाही. कारण मी सर्व जाती-धर्माचा आदर करतो. या देशात सर्वात मोठा माणूस कोणी जन्माला आला असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे मी विधानसभा तसेच लोकसभेत सांगितलेलं आहे, असं जलील यांनी स्पष्ट केलं.
मी केलेल्या आरोपांवरील लक्ष विचलित व्हावे आणि याची मदत संजय शिरसाट यांना व्हावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. संजय शिरसाट पत्रकार परिषद घेण्यास तयार नव्हते. जलील यांनी केलेल्या आरोपांवर मला विचारण्यात येऊ नये, अशी मागणी करूनच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मला जे-जे आरोप करायचे होते ते केले आहेत. मी संजय शिरसाट यांच्या स्वप्नात येतो. माझं नाव ऐकून ते रात्री उठून बसतात. इम्तियाज जलील आता कोणती पत्रकार परिषद घेतो, अशी धास्ती त्यांना लागली आहे, अशी टोलेबाजी जलील यांनी केली.
तसेच, पुढच्या एक ते दोन दिवसांत आणखी मोठी पत्रकार परिषद घेणार आहे, असा इशाराच जलील यांनी शिरसाट यांना दिला. त्यामुळे आता आगामी काळात जलील नेमका काय गौप्यस्फोट करणार. शिरसाट यांच्या अडचणी आणखी वाढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.