लग्नाच्या रुखवतासाठी 1.5 लाख? हगवणे प्रकरणात सुपेकरांच्या बायकोचे देखील नाव, वाचा काय आहे कनेक्शन

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. IPS जालिंदर सुपेकरांच्या पत्नीचे खास कनेक्शन समोर आले आहे.

लग्नाच्या रुखवतासाठी 1.5 लाख? हगवणे प्रकरणात सुपेकरांच्या बायकोचे देखील नाव, वाचा काय आहे कनेक्शन
IPS Supekar
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 31, 2025 | 5:33 PM

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात हगवणे कुटुंबाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा करणारे आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर आता आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. वैष्णवीच्या लग्नातील रुखवत जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीने तयार केला होता. तसेच त्यासाठी कस्पटे कुटुंबाकडून 1 लाख 50 हजार रुपये घेतल्याचा खळबळजनक दावा समोर आला आहे.

रुखवताचा खुलासा

वैष्णवीच्या वडिलांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवीच्या लग्नासाठी 1 लाख 50 हजार रुपयांचा रुखवत तयार करण्यात आला होता. हा रुखवत शशांक हगवणेच्या मामी, म्हणजेच जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीने तयार केला होता, असे कस्पटे कुटुंबाने सांगितले. वैष्णवीची सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे यांनी कस्पटे कुटुंबाला, “रुखवत तुम्ही बनवू नका, आमच्या नातेवाईक सुपेकरांकडून रुखवत बनवून घ्या,” असे सुचवले होते. त्यांच्या सांगण्यानुसारच कस्पटे कुटुंबाने सुपेकर यांच्या पत्नीला रुखवताची ऑर्डर दिली.

वाचा: वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट! पोलिसांनी नोंदवला जवळच्या त्या व्यक्तीचा जबाब, काय माहिती मिळाली?

पेमेंटचा तपशील

वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, रुखवतासाठी 1 लाख रुपये चेकद्वारे, तर 50 हजार रुपये रोखीने देण्यात आले. हे पेमेंट वैष्णवीच्या आईच्या बँक खात्यातून करण्यात आल्याचे कस्पटे कुटुंबाने स्पष्ट केले. या खुलाशाने जालिंदर सुपेकर यांच्या हगवणे कुटुंबाशी असलेल्या संबंधांवर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

प्रकरणाची पार्श्वभूमी

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात शशांक आणि सुशील हगवणे यांच्यावर मानसिक छळाचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप आहे. यापूर्वीच हगवणे बंधूंना अवघ्या सव्वा महिन्यात शस्त्र परवाना मिळाल्याने जालिंदर सुपेकर यांच्या प्रभावाबाबत शंका उपस्थित झाल्या होत्या. आता रुखवत प्रकरणाने या संशयाला आणखी बळ मिळाले आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात जालिंदर सुपेकर यांच्यावरील नवीन आरोपांनी खळबळ उडाली आहे. रुखवतासाठी 1.5 लाख रुपये घेतल्याचा दावा आणि सुपेकर यांच्या पत्नीचा यातील सहभाग यामुळे या प्रकरणात नवे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.