Devendra Fadanvis : महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन, विकसित भारतात महाराष्ट्राची भूमिका निर्णायक; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले ?
आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन! मुख्यमंत्री फडणवीसांनी ध्वजारोहणानंतर नागरिकांना संबोधित केलं. भारताने गेल्या काही वर्षांत केलेली आर्थिक प्रगती, जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनल्याचा त्यांनी उल्लेख केला. २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याबद्दल समाधान व्यक्त करत, केवळ आर्थिकच नव्हे तर सर्वांच्या उन्नतीची 'विकसित भारता'ची संकल्पना मांडली. या वाटचालीत महाराष्ट्राची भूमिका 'ग्रोथ इंजिन' म्हणून महत्त्वाची असल्याचे सांगितले.

आज 15 ऑगस्ट… देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीसह देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आणि देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत भारताच्या गेल्या 80 वर्षांच्या विकासप्रवासाचा आढावा घेतला. गेल्या 80 वर्षांत भारताने केलेली प्रगती ही अनेकांना थक्क करून सोडणारी आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केलं. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांत भारताने जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यापर्यंत केलेली वाटचाल विलक्षण असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातील तब्बल 25 कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यात भारताला यश आलं, ही सर्वांसाठी समाधानाची बाब असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
भारत आता विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत आहे. विकसित भारत ही केवळ मोठी किंवा विकसित अर्थव्यवस्था उभारण्याची संकल्पना नाही, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणं, सर्वांची उन्नती आणि प्रगती साधणं आणि सर्वांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल करणं, हीच विकसित भारताची खरी संकल्पना असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन
या विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र हे देशाचं ‘ग्रोथ इंजिन’ असून देशाच्या विकासातील अत्यंत महत्त्वाचं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जात असल्याचं त्यांनी नमूद केलं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आणि भारतीय संविधानाची मूल्यं यांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्र सातत्याने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जात असून, विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्राची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
याही वर्षाच्या पहिल्या सहामाहीत महाराष्ट्राचा आर्थिक विकासदर जवळपास 8.8 टक्के राहिला असून, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा हा विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनला पाहिजे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांत जवळपास 13 जिल्ह्यांनी आपले निर्धारित लक्ष्य पूर्ण केले असून, इतर जिल्हेही विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विकास हा केवळ काही भागांपुरता किंवा काही ठरावीक टप्प्यांपुरता मर्यादित न राहता, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
100 टक्के शेतकऱ्यांनी दिवसा वीज देण्याचा संकल्प
शेतकऱ्यांसाठी शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणली असून, 56 लाख शेतकऱ्यांना सुमारे 36 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येत आहे. तसेच सध्या 76 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून दिली जात आहे. पुढील वर्षभरात 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्प शासन पूर्ण करणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न
महाराष्ट्राच्या मागील आणि सध्याच्या पिढीने मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना केला आहे. मात्र, येणाऱ्या पिढीला दुष्काळ पाहावा लागू नये, हा शासनाचा संकल्प आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून पाणी पोहोचवून महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महिला शेतकरी हा कायदा तयार केला आणि पहिल्यांदा देशामध्ये महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा हा देण्याचा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
आज युवांकरता शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी निर्माण करत आहोत, तरूणाईला वर्ल्डक्लास शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी एज्युसिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणातपरदेशी विद्यापीठ येत आहेत, आपल्या विद्यापीठांचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.