Nanded | राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ नांदेड जिल्ह्यात आदिवासी पाड्यांवर अनोखा स्वातंत्र्यदिन, कोलामपोड येथे नागूबाईंच्या हस्ते ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनाच्या आधीच घरोघरी तिरंगा या मोहिमेला सुरुवात झाली. गावातील ज्येष्ठ महिला नागुबाई अर्जून टेकाम यांच्यासहित सर्वच महिलांनी सडा आणि रांगोळीने गावाची सजावट केली.

Nanded | राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ नांदेड जिल्ह्यात आदिवासी पाड्यांवर अनोखा स्वातंत्र्यदिन, कोलामपोड येथे नागूबाईंच्या हस्ते ध्वजारोहण
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 16, 2022 | 1:28 PM

नांदेडः स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) देशभरात महत्त्वाच्या व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली. नांदेड जिल्हाधिकारी (Nanded District Collector) कार्यालयाच्या वतीने अनोखा उपक्रम घेण्यात आला. तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या  किनवट तालुक्यातील कोलामपोड या अतिदुर्गम आदिवासी कोलामवस्तीवर तिरंगा (Indian Flag) फडकवण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने येथे घरोघरी तिरंगा उपक्रमही राबवण्यात आला. देशाच्या राष्ट्रपती पदावर द्रौपदी मुर्मू या आदिवासी कुटुंबातील महिलेची निवड झाल्याने त्यांच्या सन्मानार्थ जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने आदिवासी पाड्यावर अशा रितीने अनोखा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. किनवट तालुक्यात चारही बाजूने डोंगर रांगेत विसावलेल्या तब्बल 23 कोलाम वस्ती व इतर आदिवासी पाडे या उत्सवात हिरीरीने सहभागी झाले. अवघ्या 15 उबंरठयाच्या कोलामपोड येथील या उत्सवाला साक्षीदार होण्यासाठी आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, तहसिलदार डॉ. मृणाल जाधव, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, गटविकास अधिकारी सुभाष धनवे आदी उपस्थित होते.

नागुबाईंच्या हस्ते ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनाच्या आधीच घरोघरी तिरंगा या मोहिमेला सुरुवात झाली. गावातील ज्येष्ठ महिला नागुबाई अर्जून टेकाम यांच्यासहित सर्वच महिलांनी सडा आणि रांगोळीने गावाची सजावट केली. सजवलेल्या खांबावरील तिरंगा फडकावत नागुबाईंनी देश प्रेमाची एक नवी ऊर्जा दिली. “या देशाची आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर विराजमान झाली आहे. याचा सर्वांना आम्हाला अभिमान आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व देशाप्रती कृतज्ञता म्हणून आम्हाला हा तिरंगा उत्सव साजरा करताना विशेष आनंद असल्याच्या भावना” नागुबाईने आपल्या तोडक्या भाषेत सांगितल्या.

जयश्री पुरके या विद्यार्थिनीचा सत्कार

लिंबगुडा येथील रहिवाशी व शासकीय आश्रमशाळा तलाईगुडा येथे इयत्ता नववीत शिकणाऱ्या आदिम कोलाम समाजातील जयश्री भीमराव पुरके ही जवाहर नवोदय विद्यालयात प्रविष्ठ झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. शासकीय आश्रम शाळा तलाईगुडा येथील विद्यार्थिनी व तलाईगुडा येथील युवकांनी आदिवासी ढेमसा नृत्य सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. या प्रसंगी  ग्रामस्थ राजाराम मडावी यांनी मनोगत व्यक्त केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी आभार मानले.  या कार्यक्रमात बालविकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड, गावातील ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी आदिवासी निरीक्षक स्मिता पहुरकर, महाजन अर्जून टेकाम, संदीप कदम, मुख्याध्यापक सचिन चव्हाण, केंद्र प्रमुख प्रतापसिंग राठोड, जी. व्ही. चव्हाण, शंकर नागोशे , हमीद सय्यद , विनोद जक्कीलवाड, अभि. सचिन येरेकर, विस्तार अधिकारी एस.आर. शिंदे आदींची उपस्थिती होती.