
आज संपूर्ण भारतासह जगभरातही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असून त्यानिमित्ताने देशातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात ‘वारकरी भक्तियोग उपक्रम’ आयोजित करण्यात आला होता. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात लाखो वारकरी, विद्यार्थी आणि पुणकेऱ्यांसह मिळून योगासनं केली. तर अमृता फडणवीस यांनी मुंबईत योग दिवस साजार केला. त्यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.
देवेंद्रजी योगीच आहेत पण … अमृता फडणवीस यांचं विधान काय ?
‘देवेंद्रजी हे योगीच आहेत. ते कधीच कसरत करत नाही. पण ध्यान धारणा करत असतात’ अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी त्यांच्या फिटनेसवर प्रतिक्रिया दिली. आज 11 वा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. आम्ही मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचार्यांसोबत योग दिवस साजरा करत आहोत, असंही अमृता फडणवीस यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्र्याची पुण्यात वारकऱ्यांसोबत योगासनं
जागतिक योगदिनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या पुढाकाराने पुण्यात ‘वारकरी भक्तियोग उपक्रम’ झाला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखो वारकरी,विद्यार्थी अन पुणेकरांसह योगासनं केली. आम्ही आज वारकऱ्यांसह योगासनं केली, पुण्यातली कॉलेजेसही यात सहभागी झाल्याने भव्य कार्यक्रम झाला. प्राचीन संस्कृती, जीवन पद्धती, चिकित्सा पद्धती, ज्यात फक्त शरीराचा विचार केलेला नाही, मनाचाही विचार केला आहे. ती क्षमता योगात आहे. आज मोदीजींमुळे योगासनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारण्यात आलं आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माणगावमध्ये योग शिबिर
महाराष्ट्रातही विविध ठिकाणी योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. माणगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात तालुका प्रशासन आणि तालुका क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यांनी शिबिरात सहभागी होत विविध योगासने प्रत्यक्ष करून दाखवत उपस्थितांना प्रेरणा दिली. या प्रसंगी तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस अधिकारी आणि इतर शासकीय कर्मचारीही उपस्थित होते. योग दिनाच्या निमित्ताने शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.