
शशांक हगवणेचे मामा आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावतीमधील वकिलाने त्यांच्यावर मोठा आरोप केला आहे. सुपेकर यांनी थेट कैद्याकडूनच 550 कोटींची मागणी केल्याचा दावा वकिलाने केला आहे. एवढंच नाही तर कैद्यांना 300 कोटी रुपये मागितल्याचा आरोप धस यांनी केला आहे. कैद्यांच्या दिवाळी फराळात आर्थिक अपहार केल्याचा आरोप सुपेकर यांच्यावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. होत असलेल्या आरोपांसंदर्भात अखेर आता जालिंदर सुपेकर यांचं स्पष्टीकरण समोर आलं आहे.
नेमकं काय म्हणाले सुपेकर?
‘कारागृह वरिष्ठ अधिकारी म्हणून राज्यातील विविध ठिकाणच्या जेलला भेट देऊन आढावा घेणे जबाबदारी असते. अशीच भेट आम्ही १९ ऑगस्ट २०२३ मध्ये अमरावती जेलला दिली होती. त्यावेळी संबंधित जेल अधीक्षक यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. कारागृह सुरक्षा, बंदिवान बराकी, कारागृहातील स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी आमचे कोणत्याही बंदीवानांसोबत बोलणे करण्याचा प्रश्नच नाही. तसेच कोणत्याही बंदीवानांनी आम्हाला ओळखणे, त्यांच्याशी बोलणे संविधानिक नाही. माञ, तरीही अमुक-तमूक आरोपीला भेटलो, बोललो, पैशांची मागणी केली, अशा स्वरूपाचे धादांत खोटे, निरर्थक आरोप बातम्यांमधून केले जात आहेत. हे सर्व आरोप केवळ आणि केवळ आमच्या बदनामीसाठी केले जात आहेत.
अधिकारी-कर्मचारी निलंबन कारवाईबाबत
कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांना वरीष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकले नाही म्हणून कधीच निलंबित केले जात नाही. त्यांनी केलेल्या चुका, संबंधित खात्याविरोधी घेतलेली भूमिका, ड्युटीवेळी केलेला बेजबाबदारपणा, कर्तव्यातील गलथानपणा, अधिकारी-कर्मचारी यांच्याबाबतीत संबंधित घटनेचा सविस्तर रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयास पाठवला जातो. त्या रिपोर्टनुसार संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांना निलंबित केले जाते. त्यामुळे आमचे म्हणणे न ऐकल्यामुळे अमुक- तमूकाला निलंबित केले, हे आरोप निरर्थक आहेत.
डॉ.जालिंदर सुपेकर
उप-महासमादेशक, होमगार्ड’
असं सुपेकर यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत बोलताना म्हटलं आहे, त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. हे सर्व आरोप केवळ आणि केवळ आमच्या बदनामीसाठी केले जात आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.