जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं विस्तारीकरण होणार, आराखडा सादर करण्याचे मंत्र्यांचे आदेश

| Updated on: Jun 02, 2021 | 11:14 PM

जळगाव आणि चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संदर्भातील आढावा बैठक आज ऑनलाईन पद्धतीने पार पडली.

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं विस्तारीकरण होणार, आराखडा सादर करण्याचे मंत्र्यांचे आदेश
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
Follow us on

जळगाव : जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या कामाला गती देणं आवश्यक आहे. या आठवड्याच्या शेवटी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी विस्तारीकरणा संदर्भातील विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) वैद्यकीय संचालनालयाला सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज दिले आहेत. जळगाव आणि चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संदर्भातील आढावा बैठक आज ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि जळगाव आणि चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता उपस्थित होते. (Jalgaon District Government Medical College to be expanded)

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने  विस्तारीकरणा संदर्भातील विस्तृत प्रकल्प आराखडा लवकर सादर करावा. हा आराखडा वैद्यकीय संचालनालयात सादर केल्यानंतर संचालनालयाने त्याचा परिपूर्ण अभ्यास करावा. या आराखड्यात महाविद्यालय उभारणीसाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ,  जागेची उपलब्धता यांच्यासह वैद्यकीय उपकरणे आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधा याचीही परिपूर्ण माहिती द्यावी. संचालनालयाने याबाबत अभ्यास केल्यानंतर पुढील आठवड्यात यासंदर्भात बैठक लावण्यात येईल, अशी माहिती देशमुख यांनी यावेळी दिली.

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती द्यावी

चंद्रपूर येथेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येत आहे. मार्च 2022 पर्यंत हे काम कशा पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे याच्या माहितीचा एक अहवाल तातडीने संचालनालयाला सादर करण्यात यावा. संचालनालय याचा अभ्यास करून या संदर्भात पुढील बैठक पुढील आठवड्यात घेईल, असंही देशमुख यांनी यावेळी सांगितलं.

वैद्यकीय शिक्षण विभाग 15 ते 20 हजार पदं भरणार

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागात लवकरच 15 ते 20 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. विविध वर्गवारीतील ही पदांची भरती असणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती अमित देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी दिलीय. विशेष म्हणजे कोरोना काळात सलग सेवा देणाऱ्या डॉक्टरांना सामावून घेण्यासाठी देखील सरकार सकारात्मक असल्याचंही देशमुख यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

45 वर्षावरील दिव्यांगांना लसीकरणात प्राधान्य, ठाणे पालिकेचा मोठा निर्णय

नाशिक पालिका आयुक्तांच्या तंबी, खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून कोरोना रुग्णांना दाखल करून घेणं सुरू

Jalgaon District Government Medical College to be expanded