
जळगाव : आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नाराज स्थानिक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणार, हे सांगायला कुठल्या राजकीय जाणकाराची गरज नाही. महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) घटकपक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यातील नेत्यांनी एकमेकांत पक्षांतर करु नये, असा अलिखित ठरावही काही काळापूर्वी मंजूर झाला होता. मात्र स्थानिक पातळीवर याला सर्रास हरताळ फासला जाताना दिसतो. आता तर आघाडीतील मूळ पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच हा ‘एक्स्चेंज प्रोग्रॅम’ होताना दिसत आहे. जळगावात काँग्रेस आमदाराच्या (Congress MLA) समोरच काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेस आमदारांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) जळगाव दौर्यावर असतानाच हा प्रकार घडला.
जळगाव जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड जळगाव दौर्यावर गेले होते. या कार्यक्रमाला रावेरचे काँग्रेस आमदार शिरीष चौधरीही उपस्थित होते.
यावेळी चौधरींच्या समोरच काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि विधानसभा क्षेत्र प्रमुख यांनी राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर धरला. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीतच हा पक्षप्रवेश सोहळा झाला.
आपल्याच पक्षातील माजी नगरसेवक-कार्यकर्त्यांनी सोडचिठ्ठी दिल्याचं पाहून काँग्रेस आमदार शिरीष चौधरी स्टेजवरुनच गायब झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या आमदाराच्या समोरच राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधल्याने जळगाव जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे.
संबंधित बातम्या :
राज ठाकरेंच्या सभेचा टिझर आधीच रिलीज, आज पुन्हा बाळासाहेबांची झलक दिसणार?
जयश्री जाधव 50 हजार मतांनी निवडून येतील, इथं नमो नमो चालणार नाही, महाविकास आघाडीचा दावा
‘संजय राऊत राष्ट्रवादीच्या पे रोलवर’, चंद्रकांतदादांचा चिमटा; गृहमंत्री लेचेपेचे असल्याचाही टोला