इथं धुळवडीला रंग उधळले जात नाही, शेकडो वर्षांची अनोखी परंपरा यंदाही पार पडली, हजारो नागरिकांची उपस्थिती

संपूर्ण राज्यात धूळवड साजरी केली जात असतांना नाशिकमध्ये एक आगळी वेगळी परंपरा आहे. जिथं अनोखी मिरवणूक निघत असते आणि ती पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते.

इथं धुळवडीला रंग उधळले जात नाही, शेकडो वर्षांची अनोखी परंपरा यंदाही पार पडली, हजारो नागरिकांची उपस्थिती
Image Credit source: Google
| Updated on: Mar 08, 2023 | 9:00 AM

नाशिक : होळीच्या दुसर्‍या दिवशी धूलिवंदन ( Holi Festival ) असते. त्या दिवशी ठिकठिकाणी धुळवड साजरी केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणची वेगवेगळी परंपरा आहे. या दिवशी रंगाची उधळण केली जाते. होळी म्हणून हे दोन दिवस संपूर्ण देशात रंग उधळले जातात. नागरिकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत असतो. परंतु नाशिकमध्ये ( Nashik News ) एक आगळीवेगळी शेकडो वर्षांची परंपरा आहे, नाशिक मध्ये वीर ( Dajiba Veer ) नाचवले जातात. त्यामध्ये वीर दाजीबा बाशिंग म्हणून ही मिरवणूक ओळखली जाते. याच मिरवणुकीला पूर्वी बाशिंगे वीर म्हणून ओळखलं जायची. या मिरवणुकीला राज्यातील विविध ठिकाणचे लोकं हजेरी लावत असतात.

नवसाला पावणारा दाजीबा वीर म्हणून अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. त्यामुळे नवस करण्यासाठी मोठी गर्दी होत असते. लहान मुलांना याठिकाणी दर्शनासाठी अनेक जण घेऊन येतात. त्यामुळे श्रद्धेपोटी नाशिककरांची मोठी गर्दी असते.

यावेळेला दाजीबा वीर संपूर्ण मिरवणुकीत नाचत असतात. सायंकाळी सुरू झालेली ही मिरवणूक अनेकदा दुसऱ्या दिवसापर्यन्त सुरू असते. दहा ते बारा तास सुरू असलेली मिरवणूक संपूर्ण नाशिकमध्ये चर्चेचा विषय असतो. याच काळात अनेक लहान मुलं देवी देवतांची वेशभूषा करून सहभागी होत असतात.

जुन्या नाशिकमधून निघणारी ही मिरवणूक गंगाघाटावर येऊन ठेपते. दाजीबा वीर किंवा बाशिंगे वीर म्हणून ओळखली जाणारी मिरवणूक अंगणातून जाणार असल्याने ठिकठिकाणी स्वागतासाठी रंगोळी काढली जाते. महिलांकडू दाजीबा वीरचे औक्षण केले जाते.

दाजीबा वीरच्या माथ्यावर एक मुखवटा असतो. दाजीबा वीरचा मान ज्यांच्याकडे असतो त्यांच्या घरात त्यांची वर्षभर पूजा केली जाते. मिरवणुकीच्या आधी वेशभूषा केली जाते. नवरदेवाप्रमाणे त्यांना बाशिंग बांधलेले असते. नवरदेवाप्रमाणे हळदही लावलेली असते.

दरम्यान हळद लावलेल्या नवरदेवाची लग्नाची इच्छा अपूर्ण राहिली होती. त्यामुळे अशी मिरवणूक काढतांना काही विशेष बाबी केल्या जातात. त्यामुळे ज्यांची लग्न जमत नाही, ज्यांना मुलं होतं नाही अशांनी दर्शन घेतल्यास त्यांची इच्छा पूर्ण व्हायची अशी आख्यायिका सांगितल्या जातात.

डोक्याला दाजीबा वीरचा मुखवटा, हातात सोन्याचे कडे, पायात वाळा, कानात कुंडल आणि भरजरी वस्त्रे घालून दाजीबा वीर ची वाजत गाजत मिरवणूक निघत असते. ठिकठिकाणी स्वागत करून औक्षण केले जाते. दाजीबा वीर यांच्यासोबत लहान मुलंही देवाऱ्यातील वीर घेऊन नाचत असतात.

या परंपरेला तीनशे वर्षे उलटून गेल्याचे सांगतिलं जातं. जुन्या नाशिकमध्ये राहणारे रोकडे कुटुंब यांच्याकडे ही परंपरा होती. आता बेलगावकर कुटुंबात हा मान असून चाळीस वर्षे त्यांच्या घरात हा मान आहे. या मिरवणुकीने नाशिकमधील वातावरणामध्ये एक वेगळा उत्साह बघायला मिळत असतो.