भाजप नेत्याच्या उपोषणापुढे सरकार नमलं, फडणवीसांच्या आश्वासनानंतर मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

कल्याण पश्चिमेतील चिकणघर भागात शांतीदूत सोसायटीच्या पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या फसवणुकीविरोधात भाजप नेते नरेंद्र पवार यांनी केलेले आमरण उपोषण तीन दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

भाजप नेत्याच्या उपोषणापुढे सरकार नमलं, फडणवीसांच्या आश्वासनानंतर मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
devendra fadnavis kalyan
| Updated on: Aug 06, 2025 | 8:43 AM

कल्याण पश्चिमेतील चिकणघर भागातील एका पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या फसवणुकीच्या निषेधार्थ भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. आता अखेर हे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र, दोषी बिल्डर आणि त्याला सहकार्य करणाऱ्यांवर लवकरच गुन्हा दाखल न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पश्चिमेतील चिकणघर भागात असलेल्या शांतीदूत सोसायटीचा पुनर्विकास प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. म्हाडाने एका खासगी बिल्डरला हे काम दिले होते, पण वर्षानुवर्षे काम सुरू न झाल्याने सोसायटीमधील रहिवासी संकटात सापडले आहेत. या गंभीर फसवणुकीच्या विरोधात नरेंद्र पवार यांनी कल्याण डीसीपी कार्यालयाबाहेर तीन दिवसांपूर्वी आमरण उपोषण सुरू केले होते. जोपर्यंत दोषी बिल्डर आणि त्याला मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा त्यांचा निर्धार होता.

लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन

नरेंद्र पवार यांच्या आंदोलनाची दखल घेत भाजप आमदार किसन कथुरे आणि महेश चौगुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या ठोस आश्वासनानंतर नरेंद्र पवार यांनी तात्पुरते उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही

यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, “मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही उपोषण मागे घेत आहोत. परंतु, ही केवळ एक तात्पुरती स्थगिती आहे. जर प्रशासनाने लवकरच दोषींवर कारवाई केली नाही, तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू. जोपर्यंत रहिवाशांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.” यामुळे, शांतीदूत सोसायटीच्या रहिवाशांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला असून, आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील दोषींवर कधी आणि कशी कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.