
गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत महिलांना लुटणाऱ्या टोळीने हैदोस घातला होता. आता हीच टोळी कल्याणच्या दिशेने वळली आहे की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. डोंबिवलीतील महिलांना लुटणाऱ्या टोळीचा थरार शांत होत नाही तोच कल्याणमध्येही चेन स्नॅचिंगची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणमध्ये दुचाकीवर हेल्मेट आणि रेनकोट घालून आलेल्या दोन चोरट्यांनी एका ५८ वर्षीय व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिक घाबरले आहेत. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारी ५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कल्याण पूर्वेतील म्हात्रेनाका परिसरात ही घटना घडली. सुरेश नामदेव कारवे (५८) हे आपली दुचाकी घेऊन जात असताना वाहतूक कोंडीत अडकले. त्याचवेळी पाठीमागून पल्सर गाडीवर हेल्मेट आणि रेनकोट घालून दोन तरुण आले. त्यांनी सुरेश यांना अडवले. यावेळी पल्सर गाडीवर मागे बसलेल्या तरुणाने सुरेश यांना “काका, पडघा कुठे आहे?” अशी विचारणा केली. त्यावर सुरेश यांनी त्यांना दिशा दाखवत रस्ता सांगितला. यानंतर मात्र त्या चोरट्याने अचानक त्यांच्या मानेवर जोरदार थाप मारली.
सुरेश यांना आपल्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी ती वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आक्रमक चोरट्यांनी जोर लावत ती हिसकावून घेतली. या झटापटीत सोन्याची साखळी तुटली. तिचा काही भाग सुरेश कारवे यांच्या हातात राहिला, तर उर्वरित भाग चोरट्यांनी हाती लागला. अवघ्या काही सेकंदात ४५ हजारांची सोन्याची साखळी चोरत चोरट्यांनी १०० फुटी रस्त्याने मलंगगडच्या दिशेने सुसाट वेगाने पळ काढला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.
दरम्यान डोंबिवलीमध्ये अशाच प्रकारे दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रुपयांच्या साखळ्या चोरल्या गेल्या होत्या. त्यामुळे ही टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे स्पष्ट संकेत या घटनेने मिळत आहेत. सध्या कल्याण डोंबिवली परिसरात वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटना पाहता पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. खासकरून वाहतूक कोंडीत अडकल्यास किंवा अनोळखी व्यक्तीने जवळ येऊन बोलण्याचा प्रयत्न केल्यास सावध राहावे. तसेच मौल्यवान दागिने परिधान करून बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.