
राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता कल्याणमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात ९ मार्चच्या मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या २९ वर्षीय गतिमंद भावासोबत बिर्याणी घेण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणीचा ५ नराधमांनी पाठलाग करून जीवघेणा हल्ला केला आणि तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिचा भाऊ स्कूटरवरून जात असताना एका रिक्षातील 5 जणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. नेतिवली पाण्याच्या टाकीजवळ रस्ता संपल्याने त्यांना थांबावे लागले. याच संधीचा फायदा घेत आरोपींनी रिक्षामधून उतरून गतिमंद भावाला लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आपल्या भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणीला आरोपींनी केसाला धरून निर्जनस्थळी ओढत नेले. यानंतर तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला.
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी पीडित तरुणीचा मोबाईल हिसकावून तो एअरप्लेन मोडवर टाकला. आम्ही पोलिसांचे मित्र आहोत, पोलीस आमच्या हातात आहेत, अशी धमकीही तिला देण्यात आली. यावेळी त्यांनी तरुणीचे अश्लील व्हिडीओ बनवले आणि तक्रार केल्यास ते व्हायरल करण्याची धमकी दिली. या दरम्यान तरुणीच्या मदतीला आलेल्या एका दुचाकीस्वारालाही आरोपींनी मारहाण करत त्याची गाडी फोडली.
तरुणीने आपल्या आईला लोकेशन पाठवल्याचे समजताच आरोपीने स्वतःच पोलिसांना फोन केला. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपींवर कारवाई करण्याऐवजी उलट पीडित भाऊ-बहिणीलाच इतक्या रात्री बाहेर का फिरता? असे म्हणत तिथून हाकलून दिले. पोलिसांनी दाखवलेल्या या असंवेदनशीलतेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पीडित तरुणीने घरी जाऊन सर्व प्रकार सांगितल्यानंतर नातेवाईकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन मोठा गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी नितीन दिलीप बिरादार (३३) आणि अभिषेक राजकुमार सोनी (२४) या दोघांना ताब्यात घेतले आहे, तर सोहेल तांबोळी, बाबू आणि एका रिक्षाचालकाचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.